शहरात महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न गंभीर बनण्याला अनेक कारणे आहेत आणि त्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न मी विविध स्तरावर सुरू केला. त्यातूनच निदान आहेत ती स्वच्छतागृह तरी रोज दोनदा स्वच्छ व्हावीत, यासाठी माझा पाठपुरावा सातत्याने सुरू आहे. ते शक्य झाल्यास किमान कमी संख्येने हा होईना; पण असलेली स्वच्छतागृह तरी महिलांना वापरता येतील. महिला स्वच्छतागृहांची अपुरी संख्या लक्षात घेऊन मी खासदार निधीतून या कामासाठी प्राधान्य दिले होते. या कामासाठी मी माझ्या निधीतून एक कोटी रुपये देखील उपलब्ध करून दिले होते. मात्र, त्या निधीतून मोठय़ा संख्येने स्वच्छतागृह उभी राहू शकली नाहीत. कारण ज्या ज्या जागा सुचवण्यात आल्या, त्या जागांना स्थानिक नागरिकांकडून विरोध झाला.
नवीन स्वच्छतागृह उभारणीत अडचणी येत असताना किमान आहेत त्या स्वच्छतागृहांची अवस्था काय आहे याचाही आम्ही अभ्यास केला. आमच्या युवती मंचने शहरातील महिला स्वच्छतागृहांच्या सद्य:स्थितीचा अहवाल छायाचित्रांसह तयार केला. स्वच्छतागृहांची स्वच्छताच होत नसल्यामुळे त्यांचा वापरच होऊ शकत नाही. म्हणून आम्ही तेव्हाचे आयुक्त विकास देशमुख यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. त्यांनीही चांगला प्रतिसाद देत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तसे आदेशही दिले. मात्र, त्या पलीकडे काहीच प्रगती झाली नाही. दोनदा स्वच्छतेबाबतही अनास्थाच दिसून आली.
शहरात जे बहुमजली व मोठे गृहप्रकल्प तयार होणार आहेत त्यांनी इमारतीच्या एका भागात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधावे यासाठी विकास नियंत्रण नियमावलतीच बदल केले जाणार आहेत. त्या मोबदल्यात विकसकाला टीडीआर मिळेल. हा उपाय प्रभावी ठरू शकेल. मात्र, तूर्त तरी असलेल्या स्वच्छतागृहांची दैनंदिन स्वच्छता व्हावी हाच माझा आग्रहाचा विषय आहे.