संत ज्ञानेश्वर माउलींच्या वैभवी पालखी सोहळ्याचे यंदा ड्रोनच्या साहाय्याने हवाई चित्रीकरण करण्यात येणार असल्याने पालखी सोहळ्याचे वेगळे रूप भाविकांना पाहावयास मिळणार आहे. दरम्यान, यंदा पालखी वाल्हे व माळशिरस या मुक्कामाच्या ठिकाणी गावातून न जाता थेट पालखी तळावर घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त वैद्य प्रशांत सुरु व पालखी सोहळा प्रमुख श्यामसुंदर मुळे यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. माउलींच्या पालखीचे नऊ जुलैला आळंदीतून प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याचे हवाई चित्रीकरण करण्यास खासगी संस्थेला काही अटींवर मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सोहळ्याची वाटचाल व रोजच्या घडामोडी एका वेगळ्या पद्धतीने भाविकांसमोर येणार आहे. हे चित्रीकरणाचे विविध वाहिन्यांद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
पालखी गावातून नेण्याची मागणी वाल्हे व माळशिरस येथील भाविकांची होती. मात्र, सोहळ्यातील अडचणी, सेवा-सुविधा, समाज आरतीस होणारा विलंब, भाविकांची सोय आदी गोष्टींचा विचार करून या दोन्ही गावांतील मुक्कामी पालखी गावातून न नेता थेट मुक्कामाच्या तळावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आळंदी देवस्थानच्या वतीने भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी पंतप्रधान निधीस १ लाख ११ हजार १११ रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात येणार असल्याचेही सुरु यांनी सांगितले.