राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’ची मोठी चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे सेनेचे सहा खासदार फुटले. या सहा खासदारांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. त्यानंतर विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर हे देखील शिंदे सेनेच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ अद्यापही सुरूच असल्याचं बोललं जात आहे.

या सर्व घडामोडींवर बोलत असताना शिवसेना ठाकरे पक्षाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी एक मोठा दावा केला आहे. ‘मलाही शिंदेंच्या शिवसेनेची ऑफर आली होती’, असं वसंत मोरे यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

वसंत मोरे काय म्हणाले?

“सध्या फक्त ऑपरेशनचीच चर्चा आहे. हे सगळे ऑपरेशन करता करता महाराष्ट्र आयसीयूमध्ये पोहोचला आहे, तरी या लोकांचं लक्षच नाहीये. या सर्व लोकांचं फक्त ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी, ऑपरेशन ३.० असं सगळं सुरू आहे. पण दुसरीकडे महाराष्ट्र व्हेंटिलेटरवर गेला, यावर सत्ताधाऱ्यांचं लक्ष नाही. पुणे शहरात एवढे भाजपाचे नगरसेवक असतानाही एका-एका नगरसेवकालाही फोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत”, असा आरोप वसंत मोरे यांनी केला.

“सत्ताधारी या सर्व गोष्टी कशासाठी करत आहेत? सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षच नको आहे का? सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्ष ठेवायचा नाहीये, म्हणजे लोकशाही संपून टाकायची आहे का? आता राज्यकर्त्यांनी हे राजकीय ऑपरेशन थांबवले पाहिजेत आणि राज्याकडे लक्ष दिलं पाहिजे”, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

शिंदे सेनेच्या ऑफरबाबत वसंत मोरे काय म्हणाले?

तुम्हालाही ऑफर आहे का? असा प्रश्न विचारला असता वसंत मोरे म्हणाले की, “मला आता ऑफर नाही. पण मलाही शंभर टक्के आधी ऑफर आली होती. पुण्यातील एका माजी नगरसेवकाच्या माध्यमातून ही ऑफर आली होती. असं घडलं होतं की, तेव्हा मला तत्कालीन संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि खासदार संजय राऊत यांचा फोन आला आणि मला सांगण्यात आलं की पुण्याचं शहर प्रमुख म्हणून उद्या आम्ही तुमचं नाव जाहीर करणार आहोत. पण त्याच दिवशी रात्री मला शिंदे सेनेकडून ऑफर आली होती”, असा दावा वसंत मोरे यांनी केला.

“मला दुसऱ्या दिवशी ठाकरे सेनेचं पुण्याचं शहर प्रमुख पद जाहीर होणार होतं. पण त्याच्या आदल्या रात्री मला एका माजी नगरसेवकाने सांगितलं की, तात्या तुमची साहेबांनी (एकनाथ शिंदे) आठवण काढली होती. मग मी म्हटलं की कोणते साहेब? तेव्हा मला समोरून सांगण्यात आलं की, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब. मग मी त्यांना म्हटलं की का काय झालं? मी म्हटलं की तुम्ही एवढे मोठे-मोठे लोक तिकडे आहात, एवढे नगरसेवक आहात. एवढे आमदार आहात, एवढे सगळे असताना माझ्या सारख्या कार्यकर्त्याची तुम्हाला काय आवश्यकता? तेव्हा मला तिकडून सांगितलं गेलं की तुमच्याकडे सोशल मीडिया आहे. तेव्हा मी सांगितलं की नाही, मी आहे तिथेच सुखी आहे. मग मी त्यांना सांगितलं की आता महापालिकेच्या निवडणुका संपल्या, स्वीकृत नगरसेवकाची पदे संपली, आता तुम्ही मला कशाला घेता? त्यानंतर मग मी या ऑफरबाबत संजय राऊत यांना देखील कल्पना दिली होती”, असंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.