scorecardresearch

मनसेच्या कारवाईनंतर वसंत मोरेंच्या डोळ्यात अश्रू; म्हणाले, “हकालपट्टी हा विषय मला खूप लागला, रात्रभर…!”

वसंत मोरे म्हणतात, “वसंत मोरेचं पद गेल्यामुळे मनसेमध्ये फटाके वाजले आहेत. ही बाब मला फार लागली. माझ्यावर पक्ष कारवाई करेल, अशा विषयासाठी हे मला कधी वाटलं नव्हतं.”

vasant more mns raj thackeray hanuman chalisa
कारवाईबाबत बोलताना वसंत मोरे यांच्या डोळ्यांत अश्रू!

मशिदींवरील भोंगे हटवले नाहीत, तर तिथेच समोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाजवण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात घेतली होती. मात्र, आपण असं करणार नसल्याचं म्हणत मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी त्याविरोधी भूमिका घेतली. या मुद्द्यावरून पक्षानं त्यांच्यावर कारवाई करत त्यांची शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी केली. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी अजूनही आपण मनसेमध्येच असल्याचं स्पष्ट केलं असलं, तरी कारवाईविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

“मला हीच भीती वाटत होती”

वाद घालण्याची आपली कधीही भूमिका नव्हती, असं वसंत मोरे म्हणाले आहेत. “मला नेहमी जी भीती वाटत होती ती हीच होती. हीच भूमिका मी पक्षासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. २००७पासून १७पर्यंत इथले मुस्लीम बांधव एका हिंदूसाठी कायम पुढे आले आहेत. पण यांच्या दारात जाऊन भोंगे वाजवायचे, काहीतरी भूमिका घ्यायची, एकमेकांशी वाद घालायचे ही माझी कधी भूमिका नव्हती कधी”, असं मोरे म्हणाले आहेत.

“ज्या गोष्टींची मला भीती होती, ती मी मांडली होती. मी इतक्या वर्षांत यांच्यावर प्रेम केलंय. हे असंच कधी मिळत नाही. मी माध्यमांत फक्त एवढंच बोललो की हे असं काही होणार नाही. तर लगेच बोलायला लागले की साहेबांचा आदेश मोडला वगैरे”, असं देखील वसंत मोरे म्हणाले.

उचलबांगडीनंतर वसंत मोरेंना राष्ट्रवादीची खुली ‘ऑफर’, मनसे सोडणार? मोरे म्हणतात….!

“माझ्यावर पक्ष कारवाई करेल, असं कधी वाटलं नव्हतं”

दरम्यान, अशा कारणासाठी पक्षाकडून कारवाई होईल, असं कधी वाटलं नसल्याची खंत यावेळी वसंत मोरे यांनी बोलून दाखवली. यावेळी बोलताना वसंत मोरे यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. “माझ्यावर पक्ष कारवाई करेल, अशा विषयासाठी हे मला कधी वाटलं नव्हतं. या पक्षात वयाची २७ वर्ष घातली. हकालपट्टी हा विषय मला खूप लागलाय. वसंत मोरेची हकालपट्टी होऊ शकत नाही. माझ्या कार्यकर्त्यांना तोच शब्द लागलाय”, अशी भावनिक प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.

पुणे: मनसे शहर उपाध्यक्षांचा राजीनामा; वसंत मोरेंची हकालपट्टी आणि मशिदीच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेमुळे नाराजी

पक्षांतर्गत विरोधकांवर वसंत मोरेंची टीका

दरम्यान, पक्षांतर्गत विरोधकांवर देखील वसंत मोरेंनी निशाणा साधला. “मी स्वत:हून राज ठाकरेंना सांगितलं होतं की मी पुढच्या महिन्यात पद सोडतो. कारण मला जमत नाहीये. काही लोकांना वाटत होतं की पक्ष वाढू नये. पण मी कायमच पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला. ४७ वर्षातली २७ वर्ष मी राज ठाकरेंसोबत आहे. पण जो कार्यकर्ता माझ्यासोबत मोठा झाला, माझ्यासोबत नगरसेवक झाला, त्याच्या आणि माझ्यात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मी दु:खी झालो. ज्या पक्षात वसंत मोरेनं कधी फटाके वाजवले नव्हते, तिथे वसंत मोरेचं पद गेल्यामुळे फटाके वाजले आहेत. ही बाब मला फार लागली. मला रात्रभर झोप लागली नाही. हे लोकच माझा पक्ष आहे. मी अपक्ष जरी उभा राहिलो, तरी हे लोक मला निवडून देतील”, अशा शब्दांत वसंत मोरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“मी राज ठाकरेंकडे पक्षातल्या काही लोकांबद्दल तीन ते चार वेळा बोललो आहे. नावांसहित सांगितलं आहे. पण त्यांच्यावर कारवाई न होता माझ्यावर कारवाई झाली, याचं वाईट वाटतं”, अशी खंतही वसंत मोरेंनी बोलून दाखवली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-04-2022 at 13:13 IST

संबंधित बातम्या