वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित १३९ व्या वसंत व्याख्यानमालेचे २१ एप्रिल ते २० मे या कालावधीत टिळक स्मारक येथे आयोजन करण्यात आले असून, त्यात पं. शौनक अभिषेकी, देवकी पंडित, आमदार भाई जगताप, शेषराव मोरे, डॉ. मधुकर ढवळीकर यांच्यासह अनेक दिग्गजांची व्याख्याने ऐकायला मिळणार आहेत.
या व्याख्यानमालेत समाजाची बदलती मानसिकता, नवी शैक्षणिक आव्हाने अशा अनेक क्षेत्रांचा विचार करून निवडक व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि परिसंवाद आयोजित करण्यात येत आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन ‘लोकल बॉडी टॅक्स’ (एलबीटी) या विषयावरील परिसंवादाने होणार आहे. सर्व व्याख्याने टिळक स्मारक मंदिरात होणार आहेत.
बदलता महाराष्ट्र : काही नोंदी, काही निरीक्षणे-
द युनिक अॅकॅडमी आणि परिवर्तनाचा वाटसरू यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बदलता महाराष्ट्र : काही नोंदी, काही निरीक्षणे’ या विषयावर २१ ते २७ एप्रिल दरम्यान व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. शिवाजीनगर परिसरातील युनिक अॅकॅडमी येथे सर्व व्याख्याने होणार असून या वेळी दलित चळवळीतील नेते राजा ढाले, प्रा. आनंद तेलतुंबडे व डॉ. गोपाल गुरू अशा नामवंत मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.
सहजीवन व्याख्यानमाला-
२२ ते २८ एप्रिल या कालावधीत सहकारनगर परिसरातील मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे सहजीवन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, डॉ. राजीव शारंगपाणी आदी मान्यवरांची व्याख्यान आयोजित करण्यात आली आहे.