पुणे : ज्या काळात ‘मेकॅनिकल इंजिनिअर’ म्हटले की डोळ्यांसमोर पुरुषाचेच चित्र उभे राहायचे, त्या काळात एका तरुणीने या पुरुषप्रधान क्षेत्रात पाऊल टाकले. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतरही या क्षेत्रातील पुरुषप्रधानतेची झळ सातत्याने ज्यांना बसली आणि या खडतर वाटेतून ज्यांनी मार्ग काढला, त्या म्हणजे वासंता रामास्वामी. त्यांचा प्रवास केवळ अभियांत्रिकीची पदवी मिळविण्यापुरता मर्यादित नाही, तर गुणवत्तेपेक्षा ‘केवळ स्त्री आहे’ म्हणून त्यांच्याकडे पाहणाऱ्यांना गुणवत्तेद्वारेच उत्तर देऊन स्वत:ला सिद्ध करण्याचा आहे.

१९६०च्या दशकात महिलांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणे दुर्मीळ होते. त्यात मेकॅनिकल इंजिनीअरिंग हे क्षेत्र, तर पुरुषांचेच मानले जायचे. यंत्रसामग्री, वर्कशॉप, कारखाने, ग्रीस-ऑईल आणि प्रत्यक्ष यंत्रांवर काम करण्याचे क्षेत्र महिलांसाठी नाही, अशी समाजाची ठाम धारणा होती. मात्र, या चौकटींना छेद देऊन रामास्वामी यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची निवड केली. शिक्षण घेताना त्यांच्यासमोर केवळ अभ्यासाचे आव्हान नव्हते; तर आपली निवड योग्य आहे हे सर्वांना पटवून देण्याचेही आव्हान होते.

त्यांनी मन लावून अभियांत्रिकीचा अभ्यास केला आणि यथावकाश अभियांत्रिकीची पदवी हातात आली. मात्र, या क्षेत्रातील पुरुषप्रधानतेचा सामना नंतरही त्यांना करावा लागला. नोकरी शोधताना अनेक ठिकाणी त्यांच्या गुणवत्तेपेक्षा ‘त्या महिला आहेत’ यालाच अधिक महत्त्व दिले गेले. मुलाखती झाल्या, अर्ज गेले; पण नोकरीची संधी मिळत नव्हती. कारखान्यात महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसणे, रात्रपाळी, वर्कशॉपमधील काम किंवा यंत्रसामग्रीची हाताळणी अशी कारणे पुढे केली गेली. गुणवत्ता असूनही त्यांना केवळ स्त्री असल्यामुळे संधी नाकारल्या जात होत्या. त्या काळात अनेक कंपन्यांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांचीही सोय नव्हती. त्यामुळेदेखील महिलांना कामावर ठेवायचे कसे, हा प्रश्न अनेक ठिकाणी व्यवस्थापनासमोर असे.

अनेक ठिकाणी नाकारले जात असले, तरी रामास्वामी यांनी जिद्द सोडली नाही. संधी मिळेपर्यंत दार ठोठावत राहाण्याचा निर्धार त्यांनी कायम ठेवला. अखेर १९६७ मध्ये त्यांच्या आयुष्याला निर्णायक वळण मिळाले. पुण्यातील पाषाण येथील ‘आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ (एआरडीई) मध्ये त्यांची निवड झाली. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) शस्त्रास्त्र विभागात काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या जिद्दीला नवे आकाश मिळाले.

ज्या क्षेत्रात महिलांना स्वीकारण्यासच संकोच होता, त्याच क्षेत्रात रामास्वामी यांनी आपल्या तांत्रिक कौशल्याची छाप पाडली. संरक्षण क्षेत्रातील शस्त्रास्त्रे आणि उपकरणांच्या तांत्रिक रचना, आराखडे, चाचण्या आणि विकासाशी संबंधित कामात त्यांनी जबाबदारीने योगदान दिले. सुरुवातीला त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असला, तरी त्यांच्या कामाने तो बदलत गेला. त्यांच्यासाठी सर्वांत मोठा विजय म्हणजे सहकाऱ्यांच्या नजरेत झालेला बदल. ‘ही महिला आहे, त्यामुळे हे काम तिला जमेल का?’ या प्रश्नाचे उत्तर त्यांनी शब्दांनी नव्हे, तर कामातून दिले. हळूहळू त्यांची ओळख ‘महिला इंजिनीअर’ या विशेषणापलीकडे जाऊन सक्षम अभियंता म्हणून निर्माण झाली.

आज अभियांत्रिकी, संरक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. रामास्वामी यांच्यासारख्यांमुळे महिलांचा आजचा प्रवास तुलनेने सोपा झाला आहे. मार्ग दिसेनासा झाला, तरी थांबायचे नसते; जिद्दीने ते पुढे जायचे असते, असा संदेश त्या देतात.

कारकिर्दीत सामोरे जावे लागणाऱ्या नकारांनी थांबायचे नाही. उलट, प्रत्येक नकाराने जिद्द अधिक घट्ट होत गेली. आपल्याला संधी मिळाली नाही, म्हणून मागे फिरायचे नाही, तर संधी मिळेपर्यंत दार ठोठावत राहायचे, हा निर्धार प्रत्येकीने करावा. असे वासंता रामास्वामी आवर्जून सांगतात.