मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्याने कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, फ्लाॅवर, कोबी, घेवडा या फळभाज्यांच्या दरात घट झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२७ नाेव्हेंबर) राज्य; तसेच परराज्यांतून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक हिरवी मिरची, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी तसेच २ ते ३ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून २ टेम्पो शेवगा, राजस्थानातून ७ ते ८ टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून १६ ते १७ टेम्पो मटार, गुजरातमधून २ ते ३ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटकातून १५० गोणी तोतापूरी कैरी, बंगळुरूतून २ टेम्पो आले, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक लसूण, आग्रा, इंदूर तसेच पुणे विभागातून मिळून ३० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे :कोथरुड, दत्तवाडी भागात अमली पदार्थांची विक्री; साडेचार लाखांचे अमली पदार्थजप्त, तिघे अटकेत

पुणे विभागातून सातारी आले १४०० ते १५०० गोणी, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ७ ते ८ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो १२ ते १३ हजार पेटी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा ४ ते ५ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, कांदा ७० ट्रक अशी आवक झाली.

मेथी, शेपू, पुदिना, चुका, मुळा, पालक स्वस्त
मार्केट यार्डातील तरकारी विभागात मेथी, शेपू, पुदिना, चुका, मुळा, पालक या पालेभाज्यांच्या दरात घट झाली. अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. तरकारी विभागात काेथिंबिरीच्या सव्वा लाख जुडी; तसेच मेथीच्या ८० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत मेथीच्या जुडीमागे ६ रुपये, शेपूच्या जुडीमागे ४ रुपये, चुका ४ रुपये, पुदीना २ रुपये, मुळा आणि पालकाच्या जुडीमागे १ रुपयांनी घट झाली. करडईच्या जुडीमागे १ रुपयांनी वाढ झाली असून अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत.

हेही वाचा >>>पुणे: कोरेगाव पार्क, लोहगावमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक

बोरांच्या दरात घट
पावसाळी वातावरणामुळे फळबाजारात बोरांची आवक वाढली आहे. मागणीअभावी बोरांच्या दरात १० टक्क्यांनी घट झाली आहे. लिंबांच्या गाेणीमागे १०० ते १५० रुपयांनी घट झाली आहे. अन्य फळांचे दर स्थिर असल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी केरळमधून ५ ट्रक अननस, संत्री १५ ते २० टन, मोसंबी ६० ते ७० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई ८ ते १० टेम्पो, लिंबे तीन ते साडेतीन हजार गोणी, पेरु १ हजार ते १२०० क्रेट्स (प्लास्टिक जाळी), कलिंगड ४ ते ५ ट्रक, खरबूज ६ ते ७ टेम्पो, द्राक्षे ३ ते साडेतीन टन, बोरे १ हजार गोणी, सीताफळ १५ ते २० टन अशी आवक झाली.

हेही वाचा >>>राज्यात थंडीच्या हंगामातील उकाडा; मोठ्या पावसाची शक्यता नाही

मार्गशीर्ष महिन्यामुळे मासळीच्या मागणीत घट
मार्गशीर्ष महिन्यामुळे मासळीच्या मागणीत घट झाली आहे. मासळीची आवक कमी झाली असून सुरमई, रावस, हलवा या मासळीच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बांगडा, ओले बोेबिंल, कोळंबी, पापलेटचे दर स्थिर आहेत. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी १० ते १५ टन, खाडीतील मासळी २०० ते ४०० किलो, नदीतील मासळी ४०० ते ५०० किलो तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची एकूण मिळून १५ ते १८ टन आवक झाल्याची माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. मटण, चिकनचे दर स्थिर असून मार्गशीर्ष महिन्यामुळे मागणी कमी असल्याचे चिकन व्यापारी रुपेश परदेशी आणि मटण व्यापारी प्रभाकर कांबळे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetable prices fall due to increase in arrivals in the wholesale market in the market yard pune print news amy
First published on: 27-11-2022 at 16:17 IST