पुणे : मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने भेंडी, गवार, टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारली, वांगी, शेवगा, कोबी, फ्लाॅवरच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशातून मटारची आवक वाढल्याने दरात घट झाली.

गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशातून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, राजस्थानातून ६ ते ७ टेम्पो गाजर, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून २ ते ३ टेम्पो शेवगा, तामिळनाडूतून ३ ते ४ टेम्पो तोतापुरी कैरी, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, २ टेम्पो भुईमूग शेंग, २ ते ३ टेम्पो पावटा, पंजाब, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशातून ८ ते १० टेम्पो मटार, मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून ५०० ते ६०० गोणी सातारी आले, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंग ५० ते ६० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा १०० ट्रक अशी आवक झाली, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४० ते ४५ टेम्पो अशी आवक झाली.

पालेभाज्या महाग

पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने दर तेजीत आहेत. पालेभाज्यांना मागणीही चांगली आहे. बहुंताश पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर एक लाख २५ हजार जुडी, तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीर, मेथी, चाकवत, पालक या पालेभाज्यांच्या दरात घट झाली. शेपू, कांदापात, करडई, पुदिना, अंबाडी, मुळे, राजगिरा, चवळईचे दर स्थिर आहेत. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – १००० ते २०००, मेथी – १००० ते १६००, शेपू – १००० ते १५००, कांदापात – ५०० ते १०००, चाकवत – ५०० ते १०००, करडई- ५०० ते १०००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ५०० ते १०००, मुळे – १५०० ते २०००, राजगिरा – ५०० ते १०००, चुका- ७०० ते १२००, चवळई – ५०० ते १०००, पालक – १५०० ते २५००

कलिंगड, खरबूज, बोरांच्या दरात वाढ

मार्केट यार्डातील फळबाजारात कलिंगड बोरे, खरबूजच्या दरात वाढ झाली. अननस, पपई, सीताफळ, पेरू, चिकू, संत्री, माेसंबी, डाळिंब, लिंबांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात मोसंबी ७० ते ८० टन, संत्री २५ ते ३० टन, डाळिंब ३५ ते ४० टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबे तीन ते साडेतीन हजार गोणी, कलिंगड ३ ते ४ टेम्पो, खरबूज ४ ते ५ टेम्पो, चिकू एक हजार गोणी, अननस ६ ट्रक, बोरे ३०० गोणी, सीताफळ १० ते १५ टन, पेरू एक हजार प्लास्टिक जाळी (क्रेटस) अशी आवक झाली.