scorecardresearch

पुणे : गवार, भेंडी, काकडी, फ्लॉवर, कोबी, मटार महाग ;  टामेटो, घेवड्याच्या दरात घट

टोमॅटो, घेवड्याच्या दरात घट झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

पुणे : गवार, भेंडी, काकडी, फ्लॉवर, कोबी, मटार महाग ;  टामेटो, घेवड्याच्या दरात घट
(संग्रहित छायाचित्र)

मागणी वाढल्याने गवार, भेंडी, काकडी, फ्लॉवर, कोबी, मटार, ढोबळी मिरचीच्या दरात वाढ झाली. टोमॅटो, घेवड्याच्या दरात घट झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२४ जुलै) राज्य तसेच परराज्यातून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ८ ते १० ट्रक हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून मिळून ३ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, इंदूरहून ६ ते ७ टेम्पो गाजर, बेळगाव, धारवाडमधून २०० गोणी मटार, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १३ ते १४ ट्रक लसूण, आग्रा, इंदूरमधून मिळून ५० ते ५५ ट्रक बटाटा अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ८०० ते ९०० गोणी, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो १२ ते १३ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंग १०० ते १२५ गोणी, कांदा ५० ते ५५ ट्रक अशी आवक बाजारात झाली.

पालेभाज्यांची आवक कमी; दरात वाढ

गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी झाली असून पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. रविवारी घाऊक बाजारात कोथिंबिरेच्या दडी लाख जुडी, मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. कोथिंबिर, मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, पुदिना, राजगिरा, चवळई, पालकाच्या दरात वाढ झाली असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. करडई, अंबाडी, मुळा, चुक्याचे दर स्थिर आहेत. शेपूच्या दरात जुडीमागे चार रुपयांनी वाढ झाली. कोथिंबिरीच्या दरात जुडीमागे तीन रुपये, मेथी, चाकवत, पुदीना,पालकाच्या जुडीमागे प्रत्येकी दोन रुपयांनी वाढ झाली आहे. कांदापात, राजगिरा, चवळईच्या जुडीमागे एक रुपयांनी वाढ झाली आहे.

डाळिंब, पपई, पेरुच्या दरात वाढ

घाऊक फळबाजारात डाळिंब, पपई, पेरुच्या दरात वाढ झाली. कलिंगड, लिंबांच्या दरात घट झाली आहे. खरबूज, सीताफळाचे दर स्थिर आहेत. फळबाजारात केरळहून ४ ट्रक अननस, डाळिंब ५० टन, लिंबे दोन हजार गोणी, पपई ५ टेम्पो, कलिंगड १० टेम्पो, खरबूज ५ टेम्पो, पेरु ४ टेम्पो अशी आवक फळबाजारात झाली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vegetable rate in pune market yard today pune print news zws