लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : दिवाळीत दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला विभागाचे कामकाज बंद ठेवण्यात येते. यंदा रविवारी (३ नोव्हेंबर) भाऊबीज आहे. शनिवारी (२ नोव्हेंबर) बाजार आवारास साप्ताहिक सुटी असते. सलग दोन दिवस मार्केट यार्डातील घाऊक बाजाराचे काम बंद राहिल्यास बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होईल. त्यामुळे यंदा भाऊबीजेच्या दिवशी फळे, भाजीपाला विभाग, तसेच पान बाजाराचे कामकाज नियमित सुरू राहणार आहे.
सलग दोन दिवस बाजार आवाराचे कामकाज बंद ठेवल्यास भाजीपाल्याची आवक होणार नाही. सणासुदीत नागरिकांना भाजीपाला उपलब्ध होणार नाही. त्यामुळे यंदा भाऊबीजेच्या दिवशी बाजार आवाराचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. भाऊबीजेच्या दिवशी शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्री पाठवावा, असे आवाहन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी केले आहे.
आणखी वाचा-कबाब वेळेत न दिल्याने वाद; हॉटेल मालकाकडून ग्राहकाला मारहाण
भाऊबीजेच्या दिवशी केळी बाजार आणि मोशी उपबाजार बंद राहणार आहे, तसेच भाऊबीजेच्य दुसऱ्या दिवशी सोमवार (४ नोव्हेंबर) दरवर्षीप्रमाणे फूल बाजाराचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे, असे बाजारा समितीने कळविले आहे.