पुण्यामध्ये वाहन चालविण्याचा परवाना काढणे एक दिव्यच झाले असून, वाहन परवाना मागणाऱ्यांची संख्या मोठी असताना त्या तुलनेत व्यवस्था नसल्याने वाहन परवाना मिळविण्यासाठी नागरिक मेटाकुटीला आले आहेत. वाहन चालविण्याच्या चाचणीसाठी ऑनलाइन पद्धतीने तारीख व वेळ घ्यावी लागते. त्याबाबतचे संकेतस्थळ रात्री बारा वाजता सुरू होते व वीस ते पंचवीस मिनिटांतच संबंधित दिवसाच्या चाचणीच्या वेळा संपतात. त्यामुळे चाचणीची वेळ घेण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत जागरण करावे लागत असून, सद्य:स्थितीत पुढील सहा महिन्यांपर्यंत चाचणीच्या सर्व वेळा आरक्षित झाल्या असल्याने चाचणीसाठी प्रत्येकालाच सहा महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
शिकाऊ व पक्का वाहन परवाना मिळविण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागतात. शिकाऊ वाहन परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यापासूनच खरी समस्या सुरू होते. परवाना मागणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने चार ते पाच महिन्यांपर्यंत शिकाऊ परवान्याच्या परीक्षेसाठी वेळच मिळू शकत नाही. हे मोठे दिव्य पार केल्यानंतर प्रत्यक्षात वाहन चालविण्याची चाचणीसाठी वेळ घेताना नाकीनऊ येतात. चारचाकी वाहन चालविण्याची चाचणी सध्या केंद्रीय रस्ते वाहतूक संशोधन संस्थेच्या अत्याधुनिक चाचणी मार्गावर घेतली जाते. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय व िपपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या नागरिकांची वाहन चाचणी या ठिकाणी होते.
वाहन चाचणीचा अत्याधुनिक मार्ग अतिशय उत्तम व योग्य असला, तरी वाहन परवाना मागणाऱ्याच्या तुलनेत त्याची क्षमता कमी आहे. पुणे आरटीओकडून दररोज साडेचारशे नागरिकांना शिकाऊ वाहन परवाना दिला जातो. त्यामुळे या सर्वानाच सहा महिन्यांच्या आत पक्क्य़ा वाहन परवान्याच्या चाचणीसाठी वेळ मिळणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात चाचणी मार्गावर एका दिवसात पुण्यातील १२५ जणांचीच वाहन चाचणी घेतली जाते. त्यामुळे अनेकांना ही चाचणी देऊन प्रत्यक्ष परवाना मिळविण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लागतो. कित्येकदा वेळ मिळूनही क्षमतेअभावी चाचणी देता येत नाही.
पक्क्य़ा परवान्यासाठी चाचणीची वेळ ऑनलाइन घ्यावी लागते. रात्री बाराच्या दरम्यान त्याबाबतचे संकेतस्थळ सुरू होते. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत जागून वेळ घेतली जात आहे. चाचणीसाठी वेळ घेणाऱ्यांची संख्या लक्षात घेता पहिल्या वीस ते पंचवीस मिनिटांतच संबंधित दिवसातील चाचणीच्या सर्व वेळा आरक्षित होतात. त्यामुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्री बारापर्यंत जागून चाचणीची वेळ मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. त्या प्रकारामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. सध्या वाहन चाचणीच्या ३ सप्टेंबपर्यंतच्या वेळा आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे आता चाचणीची वेळ घेणाऱ्याला थेट सहा महिन्यांनंतरचीच तारीख मिळू शकणार आहे. क्षमता नसताना ऑनलाइन पद्धत व एकाच चाचणी मार्गावर चाचणी घेण्याच्या हट्टापायी नागरिकांना त्रास होत असताना त्याबाबत शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी सध्या करण्यात येत आहे.

‘‘वाहन परवाना मागणाऱ्यांच्या प्रमाणात वाहन चालविण्याच्या चाचणीची क्षमता नाही. पुण्यात वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढते आहे. त्यामुळे आणखी दोन ते तीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांची गरज आहे. परवाना मिळविण्यासाठी नागरिकांची होणारी हेळसांड टाळण्यासाठी सध्याच्या चाचणी मार्गावर केवळ व्यावसायिक वाहनांच्या चालकांची चाचणी घेतली जावी. इतर वाहनांच्या चालकांची चाचणी पूर्वीप्रमाणे आळंदी रस्ता कार्यालयात व्हावी. िपपरी-चिंचवडमधील चालकांची चाचणी त्याच कार्यालयाच्या जागेत व्हावी. यामधून सर्वाची गैरसोय दूर होऊ शकणार आहे.’’
– राजू घाटोळे,
अध्यक्ष, मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन