पुणे : नाटक, चित्रपट, मालिका आणि एकपात्री अशा विविध माध्यमांतून गेली पन्नासहून अधिक वर्षे रसिकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ हास्य कलाकार दिलीप हल्याळ (वय ६५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन विवाहित कन्या, जावई असा परिवार आहे. ‘बंपर लाफ्टर’ आणि ‘नजराणा हास्याचा’ या एकपात्री, द्विपात्री कार्यक्रमातून त्यांनी रसिकांना हसविले. एकपात्री कलाकार परिषदेचे ते माजी अध्यक्ष होते.
‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘करायला गेलो एक’, ‘माणसं अशी वागतात का?’ अशा विविध नाटकांचे त्यांनी नऊ हजारांहून अधिक प्रयोग केले होते. ‘दोघी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘बाबा लगीन’, ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘नऊ महिने नऊ दिवस’ या चित्रपटांसह ‘टोकन नंबर वन’, ‘मॅडम’, ‘फिरकी’, ‘दैवचक्र’ या मालिकांतून त्यांनी भूमिका केल्या होत्या. संगीत कार्यक्रमांचे रंगतदारपणे सूत्रसंचालन करण्यात त्यांचा हातखंडा होता. ‘भारत संचार निगम लिमिटेड’मधून (बीएसएनएल) ते सेवानिवृत्त झाले होते.