पुणे: शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या उपमुख्याध्यापकाला लष्कर न्यायालयाने दोन वर्ष साध्या कारावासाची आणि एक वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावली. सह प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. अटकारे यांनी याबाबतचे आदेश दिले. उपमुख्याध्यापकाला न्यायालयाने १५ हजार रुपये दंड ठोठावला.

सुरेश पांडुरंग सावंत (रा. हडपसर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या उपमुख्याध्यापकाचे नाव आहे. मांजरीमधील एका शाळेत जुलै २०१७ मध्ये ही घटना घडली होती. याबाबत एका शिक्षिकेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सुरेश सावंत हा शाळेत उपमुख्याध्यापक होता. सावंत काहीतरी कारण काढून शिक्षिकेला त्याचा कार्यालयात बोलावयचा. शिक्षिकेशी अश्लील वर्तन करायाचा. शिक्षिकेकडे तो वाईट नजरेने पाहायचा. १७ जुलै रोजी त्याने शिक्षिकेला मदत करण्याचा बहाणा करून कार्यालयात बोलावून घेतले आणि तिच्याशी अश्लील कृत्य केले, असे शिक्षिकेने फिर्यादीत म्हटले होते..

हेही वाचा…मनोज जरांगे पाटील विधानसभा लढण्यावर ठाम; पुण्यात ११ ऑगस्टला रॅली होणार

या खटल्यात सहायक सरकारी वकील अंजला नवगिरे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. खटल्यात दोन साक्षीदार फितूर झाले. शिक्षिकेची साक्ष, तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सावंतला शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम शिक्षिकेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिकारी सुप्रिया गावडे यांनी केला होता.