शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील एका तरुणीने लैंगिक अत्याचार आणि गर्भपात केल्याचा आरोप केला होता.यामुळे मागील दोन महिन्यापासून राजकारण चांगलेच तापले होते. त्यामध्ये भाजपच्या नेत्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उडी घेतली होती. त्या या प्रकरणावर सतत भूमिका मांडत होत्या. मला गोव्यात चित्रा वाघ यांनीच डांबून ठेवले होते असा आरोप पीडित तरुणीने चार दिवसापूर्वी केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पीडित तरुणी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यादरम्यान पीडितेने आज सकाळी पुण्यात पत्रकार परिषद भूमिका माडंली तसंच आरोपही केले.

“मी रघुनाथ कुचिक यांच्यावरील केलेले खरे असले तरी आमच्यात गैरसमज झाल्याने वाद झाले आहेत. ते बाजुला ठेवून आपआपसात मिटवावं यासाठी माझी तयारी आहे. त्याकरिता त्यांनी रविवारपर्यंत तयारी दाखवावी. तसं झाल्यास सोमवार ते बुधवार दरम्यान तक्रार मागे घेईन. पण जर ते केस लढण्यास तयार असतील तर माझी देखील केस लढण्याची तयारी आहे,” असं पीडित तरुणीने सांगितलं आहे.

तसंच ती पुढे म्हणाली की, “रघुनाथ कुचिक आणि माझ्यातील वाद मिटल्यास चित्रा वाघ यांच्यावर माझ्या भावनेचा आणि नात्याचा वापर करून बदनामी केल्याबद्दल अब्रूनुकसानीचा दावा करणार आहे”. त्याचबरोबर या प्रकरणात आणखी एक व्यक्ती असून त्याने आमच्यात वाद निर्माण केले आहेत. त्या व्यक्तीविरोधात देखील गुन्हा दाखल करणार असल्याचे पीडितेने सांगितलं आहे.