‘मंदा’ शिखरावर पुण्यातील गिर्यारोहकांची विजयी पताका

‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांनी देखील यापूर्वी १९८९ आणि १९९१ अशी दोन वेळा ‘मंदा-१’वर मोहीम आयोजित केली होती.

‘गिरिप्रेमी’च्या तीन गिर्यारोहकांकडून सर्वात अवघड शिखर सर

पुणे : केदारगंगा खोऱ्यातील ‘मंदा-१’ या शिखराच्या माथ्यावर पुण्यातील ‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांनी आपली विजयी पावले उमटवली आहेत. ६५१० मीटर उंच आणि चढाईसाठी अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या या शिखरावर उत्तर धारेने यशस्वी चढाई करणारी ‘गिरिप्रेमी’ ही पहिली भारतीय गिर्यारोहण संस्था ठरली आहे.

एव्हरेस्ट शिखरवीर आनंद माळी याच्या नेतृत्वाखाली डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे आणि पवन हडोळे या तीन गिर्यारोहकांनी हे यश प्राप्त केले आहे. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे हे या मोहिमेचे मार्गदर्शक होते. तर निकुंज शहा या गिर्यारोहकाने या मोहिमेत मुख्य संघाला ५००० मीटरपर्यंत चढाई करत मदत करण्याचे काम केले.

हिमालयातील केदारगंगा खोऱ्यातील ‘मंदा’ हा तीन शिखरांचा समूह आहे. यापैकी ‘मंदा-१’ शिखराची उंची ६५१० मीटर असून चढाईसाठी हे अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. ७० ते ८० अंश कोनातील हिमभिंतीवरील चढाई, सतत होणारे हिमप्रपात, कोसळणाऱ्या दगडांचा मारा, मृत्यूचे भय दाखवणाऱ्या हिमभेगा, सोबतीला उणे तापमान आणि तीव्र वेगाने वाहणारे अती थंड वारे या साऱ्या आव्हानांमुळे या शिखरासाठी आजवर बोटावर मोजण्याइतक्याच मोहिमांचे आयोजन केले गेले. यातही बहुतांश वेळा या शिखरमाथ्याने गिर्यारोहकांना हुलकावणी दिली आहे.

‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांनी देखील यापूर्वी १९८९ आणि १९९१ अशी दोन वेळा ‘मंदा-१’वर मोहीम आयोजित केली होती. मात्र या दोन्ही वेळा संघाला शिखर सर करण्यात अपयश आले होते. तीन दशकांनंतर पुन्हा नव्या चिकाटीने, नव्या दमाच्या गिर्यारोहकांच्या जोरावर ‘गिरिप्रेमी’ने या मोहिमेचे आयोजन केले. निवडक गिर्यारोहकांचा संघ, त्यांची विशेष तयारी करून घेत मोहिमेला सुरुवात केली आणि जिद्द, कौशल्य आणि तंत्र याचे अतुच्य प्रदर्शन घडवत ‘मंदा-१’वर पाऊल टाकले. या यशामुळे शिखरावर उत्तर धारेने चढाई करणारी ‘गिरिप्रेमी’ ही पहिली भारतीय गिर्यारोहण संस्था ठरली आहे. या मोहिमेसाठी ‘व्हाइट मॅजिक’ संस्थेने मोलाचे सहकार्य केले.

भ्रिगु पर्वतावरही चढाई

‘मंदा-१’ या मोहिमेसोबतच केदारगंगा खोऱ्यातच असणारे ६०४१ मीटर उंच असलेल्या भ्रिगु पर्वत शिखरावरही ‘गिरिप्रेमी’च्या अन्य संघाने यशस्वी चढाई केली. या मोहिमेत आनंद माळी, वरुण भागवत, ऋतुराज आगवणे, अंकित सोहोनी आणि रोहन देसाई या गिर्यारोहकांनी भाग घेतला. विशेष म्हणजे भ्रिगु पर्वतावर ३० वर्षांपूर्वी ‘गिरिप्रेमी’नेच पहिली यशस्वी मोहीम केली होती.

‘मंदा-१’ हे सर्वार्थाने आव्हानात्मक शिखर आहे. हे शिखर गिर्यारोहकांचे अतीव परीक्षा पाहणारे आहे. यामुळे आजवरच्या मोहिमांना यशासाठी मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. या चढाईसाठी गिर्यारोहक मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अतिशय कणखर असावा लागतो. ‘गिरिप्रेमी’च्या या यशाने तीन दशकांहून अधिक काळ उरी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. हे यश भारतीय गिर्यारोहण क्षेत्रासाठी एक सुवर्ण क्षण आहे.

– उमेश झिरपे, ज्येष्ठ गिर्यारोहक, मोहिमेचे मार्गदर्शक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Victory flag of pune mountaineers on manda peak akp