धनंजय मुंडे यांची टीका

विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपताना वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे आल्यास सोयीचे व्हावे म्हणून विकासाबाबतचा ओढा विदर्भाकडे दिसून येत आहे. विदर्भाचा विकास झालाच पाहिजे परंतु, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उर्वरित भागातही समप्रमाणात विकास होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी केले.

मराठवाडय़ात औद्योगिक विकास झाल्याशिवाय सर्वागीण विकास होणार नाही. मराठवाडय़ात मोठय़ा प्रमाणात उद्योग आले पाहिजेत आणि उद्योग सर्वत्र उभे राहिले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

मराठवाडा प्रोफेशनल क्लबतर्फे आयोजित थेट संवाद कार्यक्रमात मुंडे बोलत होते. आयोजक विठ्ठल कदम, औदुंबर खुने पाटील, विशाल कदम, कुलदीप आंबेकर या वेळी उपस्थित होते.

मराठवाडय़ाच्या हक्काचे बावीस टीएमसी पाणी अद्याप मिळालेले नाही. तसेच कृष्णा-गोदावरीच्या पाण्यासाठी ठेवलेले चार हजार कोटी रुपये कुठे आहेत, असा सवाल करून मुंडे म्हणाले, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना वर्षांतून एकदा मंत्रिमंडळाची बैठक मराठवाडय़ात होत असे. त्यामध्ये मराठवाडय़ाच्या सर्वागीण विकासाबाबत चर्चा होऊन निर्णय होत असत. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा करूनही ते बैठक घेत नाहीत. मराठवाडय़ात ऊसतोड कामगारांना योग्य मोबदला मिळण्यासाठी लवाद नेमण्यात आला. शरद पवार आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी तोडगा काढून दर तीन वर्षांनी कामगारांना मोबदला वाढवून देण्याबाबत निर्णय झाला. आताच्या सरकारने तीन ऐवजी दर पाच वर्षांनी मोबदल्यात वाढ होण्याचा निर्णय घेतला आहे. उसाबरोबर, कापूस, तूर, उडीद, सोयाबीन यांना योग्य भाव मिळणे, आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे अशा विविध शेतीप्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चालू महिन्याच्या अखेरीला पायी दिंडी काढण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘सत्तेत आल्यापासून राबविलेल्या योजनांचे लाभार्थी सापडू नयेत, हे सरकारचे खरे अपयश आहे. सरकारने ज्या जाहिराती केल्या. त्या सर्व व्यक्तींना आघाडी सरकारच्या काळात लाभ मिळाला आहे. खोटय़ा जाहिराती कराव्यात हे राज्याचे दुर्दैव असून योजना राबविण्यातही शासन अपयशी ठरले आहे’, असेही मुंडे यांनी सांगितले.

फडणवीसांनी तरी कुठे सांगितले होते

विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसदेखील अभ्यासू म्हणून विधिमंडळात बोलत असत आणि भाजपची सत्ता आल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्याप्रमाणेच तुम्हीदेखील अभ्यासू पद्धतीने विधिमंडळात आणि वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत नेहमी भाग घेता. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आल्यास मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्न मुंडे यांना विचारण्यात आला. त्यावर सत्ता येण्याआधी मुख्यमंत्री होण्याबाबत फडणवीसांनी तरी कुठे सांगितले होते, असे मुंडे यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.