पिंपरी : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था हा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटल्याने पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकारी तीव्र इच्छुक होते. परंतु, पुण्यातील उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी आमदार विलास लांडे यांनी आर्थिक निकष पाहून विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या नवख्या आहेत. अजितदादा गेल्याची जखम मोठी होती. आता संधी डावल्याची जखम झाली असल्याचे सांगून शहराध्यक्ष योगेश बहल यांनी नाराजी बोलून दाखविली.

भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) या तिन्ही पक्षाच्या महायुतीमध्ये पुणे स्थानिक स्वराज्य संस्था हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटला आहे. या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे पदाधिकारी तीव्र इच्छुक होते. भाजपचे विधानसभेचे दोन आणि विधानपरिषदेचे दोन असे शहरात चार आमदार आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपला आव्हान देण्यासाठी शहरातील पदाधिकाऱ्याला विधानपरिषदेवर संधी देण्याची मागणी स्थानिकांनी पक्षाच्या अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांच्याकडे केली होती. माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, नगरसेवक नाना काटे, संदीप वाघेरे विधानपरिषद उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु, पुण्यातील विक्रम काकडे यांना उमेदवार देण्यात आली. त्यामुळे इच्छुकांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखविली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, दिवंगत अजित पवार यांच्याबरोबर ३४ वर्षांपासून एकनिष्ठपणे काम केले. पिंपरी मतदारसंघ राखीव असल्याने विधानसभा निवडणूक लढविता आली नाही. सर्व वस्तुस्थिती पक्षश्रेष्टींना सांगितली होती. वरिष्ठ असल्याने माझी दावेदारी प्रबळ होती. महापालिकेत सातवेळा निवडून आलो. महायुतीचे बहुमत असल्याने निवडणूक सोपी होती. त्यामुळे शंभर टक्के उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, मोठा भ्रमनिरास झाला आहे. तीव्र नाराज आहे. आता काही निर्णय घेणे चुकीचे होईल. सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या निर्णयाबरोबर राहणार आहे. पक्षश्रेष्टींच्या वेगळ्या अडचणी असू शकतात. सुनेत्रा पवार या नवख्या आहेत. अजितदादा गेल्याची जखम मोठी होती. आता संधी डावल्याची जखम झाली आहे.

माजी आमदार विलास लांडे म्हणाले, पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांची नाळ तुटायला लागली आहे. उमेदवारीसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना भेटलो होतो. अजितदादांच्या निधनामुळे आम्ही हतबल असून आमच्या पाठीमागे कोण राहिलो नाही, अशी भीती कार्यकर्त्यांमध्ये आहे. प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळायला पाहिजे होती. विक्रम काकडे कोणत्या खाणीतील हिरा आहे हे माहिती नसून पक्षाने शोधून काढला आहे. त्यांच्याकडे काहीतरी वेगळी क्षमता असेल म्हणून त्यांना संधी दिली असेल. आर्थिकदृष्ट्या ताकदवान असल्याने त्यांना उमेदवारी दिली. मी १९९० पासून मी अजित पवार यांच्याबरोबर काम केले. शहरातील कोणालाही उमेदवारी मिळाली असती, तर शहरात संघटना वाढली असती. काकडे यांचे काम करणार आहोत.