स्त्री-पुरूष समानतेसाठी स्त्रीवादाची वेगळी मांडणी करत महिलांच्या प्रगतीसाठी विद्या बाळ यांनी आयुष्य वेचलं. लेखिका, पत्रकार आणि महिला कार्यकर्त्या असलेल्या विद्या बाळ यांनी महाराष्ट्रातील स्त्रीवादी चळवळ आणि संस्थात्मक कार्यातून समाजातील मानसिकता बदलण्याचे प्रयत्न केले. स्त्रियांना समृद्ध जीवन जगता यावे, यासाठी पुरूषभान यायला हवं असं म्हणत त्यांनी लिखाणाला कृतीची जोड दिली. विद्याताईंनी स्त्री या मासिकात २२ वर्षे पत्रकार कार्यकर्ता म्हणून काम केलं. याच काळात त्यांनी ‘नारी समता मंच’ची स्थापना केली. पुढच्या टप्प्यात स्त्री आणि पुरूष यांच्यातील संबंधांची नवी मांडणी करणारे ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक त्यांनी सुरू केले. त्याचबरोबर ‘सखी मंडळा’ची स्थापनाही केली.
व्यापक कार्य
महिलांची उन्नती हेच ध्येय ठेवून काम करणाऱ्या विद्याताईंनी प्रश्नांशी संबंधित इतर सामाजिक विषयांचीही मांडणी केली. बोलते व्हा, पुरूष संवाद केंद्र, अक्षरस्पर्श ग्रंथालय, साथ साथ विवाह अभ्यास मंडळ, पुरूष उवाच अभ्यासवर्ग या संस्था त्यांनी सुरू केल्या. लेख, अनुवाद, कांदबरी, संपादक आदी शैलीत त्यांनी लिखाण केलं. त्यांच्या एकूण कार्याची दखल घेत महाराष्ट्र फाऊंडेशननं त्यांचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानही केला आहे. त्याचबरोबर अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत.