पुणे : गणेशोत्सवातील ध्वनीवर्धक यंत्रणेविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी संतोष चव्हाण याला न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी दिले.
विद्यानंद बापट हे गुरुवारी (३ सप्टेंबर) टिळक रस्ता परिसरात एका वृत्तवाहिनीला मुलाखत देण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांना आरोपीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. बापट यांना मारहाण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संतोष शंकर चव्हाण (वय ३२, रा.राऊतवाडी, कोथरूड) याला गुरुवारी रात्री अटक केली. या बाबत विद्यानंद सुहास बापट (वय ३७, रा. नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चव्हाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३५३ (२) (खोटी माहिती किंवा अफवा पसरून सार्वजनिक शांततेचा भंग), १२६ (२) (जाणूनबुजून अडवणूक), २९६ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करणे), १५५ (२) (गंभीर दुखापत करणे), ३५१ (२), (धमकावणे) या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
चव्हाण याला अटक करून विश्रामबाग पोलिसांनी शुक्रवारी (४ सप्टेंबर) न्यायालयात हजर केले. ‘या प्रकरणात अन्य कोण सामील आहेत का, आरोपी आणि फिर्यादीचे पूर्वीचे वाद आहेत का, चव्हाण याने समाजमाध्यमात एक चित्रफीत प्रसारित केली होती. त्याच्याविरुद्ध यापूर्वी मारहाण केल्याप्रकरणी सहा गुन्हे दाखल आहेत, आरोपी हा कोथरूड भागात राहायला आहे. बापट टिळक रस्त्यावर आले होते. चव्हाण याला ही माहिती कशी मिळाली, या दृष्टीने तपास करायचा आहे,’ अशी विनंती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे आणि सरकारी वकील आर. डी. कोरडे यांनी न्यायालयाकडे केली.
चव्हाण याच्या वतीने ॲड. हेमंत भांड-पाटील, ॲड. खेतराम सोलंकी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी चव्हाण याला पोलीस कोठडी देण्यात येऊ नये, अशी विनंती न्यायालयाकडे केली. ‘आरोपी चव्हाण हा स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला आहे. त्याच्या मनात फिर्यादीविषयी द्वेेषभावना नव्हती. आरोपीला नोटीस देऊन सोडता आले असते. माध्यमांच्या दबाबामुळे या प्रकरणाला अनावश्यक महत्त्व दिले जात आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी,’ अशी विनंती ॲड. भांड-पाटील, ॲड. साेलंकी यांनी युक्तिवादात केली.
