पुणे : डीजे विरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्या युवकावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रकरणी मारहाण करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. मात्र, मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यानंद बापट यांना टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी बापट यांना सुरक्षित स्थळी नेले. त्याचप्रमाणे मारहाण करणाऱ्या युवकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सवासंदर्भात पुणे पोलीस दलाच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्यामध्ये बोलताना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या घटनेसंदर्भात भाष्य केले. ‘विद्यानंद बापट यांना केलेली मारहाण निंदनीय आहे. अशा कृतीमुळे उत्सवाच्या का‌ळामध्ये वातावरण दूषित होते. देशात प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. तो बजावताना कोणी लक्ष्मणरेषा पार केली तर त्याच्यावर पोलीस कारवाई करतील. मात्र, मारहाण करून आपण कायदा हातात घेऊ नये,’ असे आवाहन अमितेशकुमार यांनी कार्यकर्त्यांना केले.