पुणे : गणेशोत्सवात ध्वनिवर्धकांचा वापर थांबवण्यासाठी आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. त्यानंतर बापट यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले असून, त्यांची वैद्यकीय चाचणी करून मारहाण केलेल्याविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पुणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच बापट यांना पोलिस संरक्षण पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे.
मारहाणीच्या घटनेनंतर पुढील कार्यवाहीबाबत पत्रकारांशी बोलताना पुणे पोलिसांच्या परिमंडळ १चे उपायुक्त कृषिकेश रावले म्हणाले, विद्यानंद बापट यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. त्यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. बापट यांनी गणेशोत्सवासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना मारहाण झाली की काही वैयक्तिक वाद आहे, याचा तपास करण्यात येईल.
बापट यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी
गणेशोत्सवातील डीजेसंदर्भात विद्यानंद बापट यांनी मांडलेल्या भूमिकेला तार्किक दृष्टीकोनातून बघण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करणे हे पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. मतभेद असू शकतात, त्यांची भूमिका पटत नसेल तर वैचारिक विरोध करा, बापट ज्याप्रमाणे विचाराने भूमिका मांडतात त्याप्रमाणे भूमिका मांडा, परंतु अशाप्रकारे गुंडगिरी केली जाणार असेल तर हे अजिबात योग्य नाही. पोलीस प्रशासनाने बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या गावगुंडावर योग्य त्या कायदेशीर कलमाअंतर्गत कारवाई करावी आणि विद्यानंद बापट यांना संरक्षण पुरवावे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.
