सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापराविरोधात भूमिका मांडणारे पुण्यातील विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी टिळक रोड परिसरात एका व्यक्तीने हल्ला केला. बापट हे एका टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत असताना ही घटना घडली. याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने आरोपी संतोष चव्हाण याला ताब्यात घेतले आहे.
आरोपीची ओळख: संतोष चव्हाण हा पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असून तो एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करतो. तो राऊतवाडी येथील ‘प्रियदर्शनी गणेश मंडळा’चा माजी अध्यक्ष आहे.
हल्ल्याचे कारण: बापट यांच्या डीजे आणि साऊंड सिस्टीमविरोधातील भूमिकेवर चिडून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
आरोपीचे वक्तव्य काय?
बापट यांना केलेल्या मारहाणीनंतर माध्यमांशी बोलताना संतोष चव्हाण म्हणाला, “तो (विद्यानंद बापट) सातत्याने टीका करतो, त्याला आणखी मारायला पाहिजे. पुणे शहरातील गणेशोत्सवाबाबत जो कोणी बोलेल, त्याच्या अशाच कानाखाली मारणार.”
त्यानंतर संतोष चव्हाण यांचा एक जुना व्हिडीओही समोर आला. त्यात त्याने आपली भूमिका मांडताना म्हटले की, “साऊंड सिस्टीममुळे त्रास होत असला तरी मर्यादेत आवाज ठेवल्यास अडचण येणार नाही. पुणे शहरात हजारो गणेश मंडळे असून या उत्सवामुळे कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते आणि हजारो कुटुंबांची चूल पेटते. गणेशोत्सव आला की काही लोक पर्यावरणवादी बनून ज्ञान देतात.”
सध्या पुणे पोलीस आणि गुन्हे शाखा या प्रकरणी संतोष चव्हाणची सखोल चौकशी करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजे आणि लाऊडस्पीकरच्या अमर्याद वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी ठाम मागणी विद्यानंद बापट गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. याच मुद्द्यावर ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. प्रत्यक्ष थेट प्रक्षेपण सुरू असतानाच गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला एक तरुण तिथे आला. “तुला यावर आक्षेप घ्यायला कोणी सांगितलं?” असा सवाल करत त्याने बापट यांच्याशी हुज्जत घातली. “मला याला आणखी दोन मारू द्या,” असे म्हणत त्याने थेट बापट यांच्यावर हात उगारला आणि मारहाण केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
मारहाणीनंतर विद्यानंद बापट यांची पहिली प्रतिक्रिया
हल्ल्याच्या या घटनेनंतर बोलताना विद्यानंद बापट यांनी ‘टीव्ही ९’ मराठीला प्रतिक्रिया दिली. बापट म्हणाले, “सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी एक वेडा माणूस आला आणि त्याने हा प्रकार केला. त्याला केवळ प्रसिद्धीच्या झोतात यायचे होते.”
