गणेशोत्सव आणि सार्वजनिक सणांमधील ढोल-ताशे, डीजे आणि लाऊडस्पीकरच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात आग्रही भूमिका घेणारे पुण्यातील विद्यानंद बापट यांच्यावर थेट कॅमेऱ्यासमोर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना त्यांना मारहाण झाली.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजे आणि लाऊडस्पीकरच्या अमर्याद वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी ठाम मागणी विद्यानंद बापट गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. याच मुद्द्यावर ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. प्रत्यक्ष थेट प्रक्षेपण सुरू असतानाच गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला एक तरुण तिथे आला. “तुला यावर आक्षेप घ्यायला कोणी सांगितलं?” असा सवाल करत त्याने बापट यांच्याशी हुज्जत घातली. “मला याला आणखी दोन मारू द्या,” असे म्हणत त्याने थेट बापट यांच्यावर हात उगारला आणि मारहाण केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
मारहाणीनंतर विद्यानंद बापट यांची पहिली प्रतिक्रिया
हल्ल्याच्या या घटनेनंतर बोलताना विद्यानंद बापट यांनी ‘टीव्ही ९’ मराठीला प्रतिक्रिया दिली. बापट म्हणाले, “सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी एक वेडा माणूस आला आणि त्याने हा प्रकार केला. त्याला केवळ प्रसिद्धीच्या झोतात यायचे होते.”
आपला संताप व्यक्त करताना त्यांनी संस्कृत सुभाषितेचा दाखला देत, ‘घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्’ (म्हणजेच कोणत्याही थराला जाऊन प्रसिद्धी मिळवण्याची विकृती) असा टोलाही लगावला.
‘त्याला आत टाका आणि तुडवा’ – बापट यांची पोलिसांकडे मागणी
या घटनेनंतर बोलताना बापट पुढे म्हणाले, “मी पोलिसांना सांगितले आहे की, या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ फुटेज तुमच्याकडे उपलब्ध आहे. त्या पुराव्यांच्या आधारे संबंधित आरोपीला तातडीने ताब्यात घ्या आणि चांगलाच धडा शिकवा. अशा माणसाला सरळ शब्दांत सांगितलेले कळणार नाही, कारण तो वेडा होता.”
पुणे पोलीसांनी काय सांगितलं?
विद्यानंद बापट यांच्याबाबत मनात राग असलेल्या माणसानं त्यांना मारहाण केली आहे. पण त्यांना मारहाण करणारा कोण होता? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. त्याचा तपास चालू आहे. जुन्या वादातून मारहाण झाली आहे का की रागातूनच हे झालं याबाबतही तपास चालू आहे. विद्यानंद बापट ज्या प्रकारची तक्रार करतील, त्यानुसार पोलीस त्यावर कारवाई करतील. सीसीटीव्हीमध्येदेखील सध्या मारहाण करणारी एकच व्यक्ती दिसत आहे. – पुणे पोलीस उपायुक्त ऋषिकेश राउळे
