पुणे : गेला महिनाभर उत्सवातील ध्वनिवर्धकांच्या वापराविरोधात आवाज उठविलेल्या विद्यानंद बापट यांच्याविरोधात काही गणेश मंडळांनी ध्वनिवर्धकांचा वापर करून ‘आव्वाज’ घुमवला. बापट यांची छायाचित्रे, त्यांनी केलेल्या विधानांचा वापर करून त्यांची उच्च रवात खिल्ली उडविण्यात आली. याविरोधात न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती बापट यांनी दिली.
गणेशोत्सवापूर्वी पुणे महापालिकेत झालेल्या नियोजनाच्या बैठकीत बापट यांनी ध्वनिप्रदूषण आणि रहदारीस अडथळा होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यानंतर दबाव टाकून बापट यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आले. त्या बाबतची चित्रफित समाजामाध्यमांत प्रसारित झाली. त्यामुळे विद्यानंद बापट प्रसिद्धीस आले. पुणेकर नागरिकांनीही मोर्चे काढून या मुद्द्याला पाठिंबा दिला. बापट यांना मारहाणीचीही घटना घडली. मात्र, विद्यानंद बापट यांच्यामुळे यंदा संपूर्ण उत्सवात ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चांगलाच गाजला.
त्या पार्श्वभूमीवर, विसर्जन मिरवणुकीत काही गणेश मंडळांनी बापट यांची भूमिका न पटल्याने त्यांची खिल्ली उडवणारे देखावे सादर केले. ‘बापट मिसिंग’ असे फलक घेऊन काही जण मिरवणुकीत सहभागी झाले. एका ढोलताशा पथकाने ढोलाच्या पानावर बापट यांच्या छायाचित्रासह ‘पुण्यात ढोल-ताशाचा त्रास कोणालाही होत नाही’ असा उल्लेख केला. बापट यांच्या विधानांचा वापर करून ती ध्वनिवर्धकांवर गाण्यांच्या स्वरुपात वाजवण्यात आली. याबाबतच्या चित्रफिती समाजमाध्यमांत प्रसारित झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या विद्यानंद बापट यांच्याविरोधात विसर्जन मिरवणुकीत पडसाद उमटल्याचे दिसून आले.
या पार्श्वभूमीवर, गणेश मंडळांविरोधात न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची तयारी सुरू केली असल्याचे बापट यांनी सांगितले. दरम्यान, ‘बापट यांच्या नाराजीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे,’ असे आश्वासन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले.
