Vidyanand Bapat Pune DJ Loudspeaker Attack: सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापराविरोधात पुण्यातील विद्यानंद बापट गेल्या काही दिवसांपासून भूमिका मांडत आहेत. बापट गुरुवारी टिळक रोड परिसरात वृत्तवाहिनीशी चर्चा करत असताना संतोष चव्हाण याने त्यांच्यावर हल्ला करत, तोंडावर फटका मारला. या हल्ल्याच्या निषेधार्थ आता विद्यानंद बापट यांच्या भूमिकेचे समर्थन करणारे नागरिक एकवटले आहेत. दरम्यान, आता बापटना पाठिंबा देण्यासाठी रविवारी पुण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी पुणे पालिकेवर मोर्चा

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत यांनी याबाबत एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन रविवारी आयोजित आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. राहुल सावंत यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. तसेच, डीजेच्या विरोधात आंदोलन जाहीर करण्यात आल्याचे सांगितले. रविवारी सकाळी अकरा वाजता बालगंधर्व चौक, झाशीची राणी पुतळ्याजवळ एकत्र येऊन पुणे महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सावंत यांनी या व्हिडीओतून सांगितले आहे. सावंत यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

बापटांना पूर्ण पाठिंबा जाहीर

सावंत यांनी पुढे बोलताना विद्यानंद बापट यांच्या भूमिकेचे समर्थन करत असल्याचे सांगितले. “बापट यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत आणि त्यांना पूर्ण पाठिंबा असेल”, असे राहुल सावंत यांनी पुढे सांगितले. दरम्यान, टिळक रोड परिसरात विद्यानंद बापट टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांच्या संतोष चव्हाण याने हल्ला केला. चव्हाण याने बापट यांच्या तोंडावर फटका मारला यानंतर बापट यांना पत्रकार आणि इतरजण दूर घेऊन गेले. तर, इतरांनी हल्लेखोर चव्हाण याला रोखण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र जोरदार व्हायरल झाला आहे.

मारहाण करणारा ताब्यात

दरम्यान, बापटांवर हल्ल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने संतोष चव्हाण याला ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मारहाणीची घटना योग्य नसल्याचे म्हटले आहे. “अशा पद्धतीनं मारहाण करणं योग्य नाही. शेवटी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हल्ला करणं योग्य नाही. पुण्यासारख्या ठिकाणी असे वाद योग्य वाटत नाहीत. आपला गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीकडे नेला पाहिजे. त्या दृष्टीनं पाऊल उचलले पाहिजेत”, असे फडणवीस म्हणाले.