पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला विरोध करताना विद्यानंद बापट यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे मांडले आहेत. विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी (३ ऑगस्ट) पुण्यातील टिळक रोड परिसरात हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर आता बापट यांच्या समर्थनार्थ आणि ‘डीजेमुक्ती’साठी रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चाही काढण्यात येणार आहे.

सार्वजनिक ठिकाणचे ध्वनिप्रदूषण म्हणजे सॉफ्ट हिंसाचार

उत्सवांच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी होणारे ध्वनिप्रदूषण हा एक प्रकारे ‘सॉफ्ट हिंसाचार’च आहे, अशी भूमिका विद्यानंद बापट यांनी मांडली आहे. वाढत्या त्रासामुळे नागरिकांना आपले राहते शहर आणि घर सोडून जावे लागत असल्याचे सांगत त्यांनी सार्वजनिक सणांच्या स्वरूपावर संताप व्यक्त केला.

उत्सवांची नागरिकांना शिक्षा

उत्सवांची नागरिकांना शिक्षा झाली असून सध्या ‘उत्सवांची दहशत’ निर्माण झाली आहे, असे बापट म्हणाले. “जशी ‘लष्कर-ए-तोएबा’ ही दहशतवादी संघटना आहे, तशीच या उत्सवखोरांची अवस्था आता ‘लष्कर-ए-उत्सव’ किंवा ‘लष्कर-ए-सण’ अशी झाली आहे,” अशी तुलना त्यांनी केली.

या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागत आहे. या सगळ्या धिंगाण्याचा आणि गोंधळाचा अंतिम परिणाम किंवा ‘आउटपुट’ शून्य आहे. हा संपूर्ण प्रकार अत्यंत हास्यास्पद व्यवसाय बनला असून तो तात्काळ बंद केला पाहिजे, अशी मागणी विद्यानंद बापट यांनी केली आहे. उत्सव हा मुळात आनंदाचा असावा, पण आज त्याचे रूपांतर दहशतीत झाले असल्याचे मत त्यांनी शेवटी व्यक्त केले.

“पुणे शहराला तुम्ही सांस्कृतिक राजधानी म्हणून मिरवता, ‘ही’ तुमची संस्कृती आहे का?”

पत्रकार परिषदेत बोलताना बापट म्हणाले, “मी कोण आहे यापेक्षा माझा मुद्दा काय आहे हे अधिक महत्त्वाचे आहे. पुणे शहराला तुम्ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून मिरवता, मग हीच तुमची संस्कृती आहे का?” गणेशोत्सवातील सध्याच्या अव्यवस्थेवर बोट ठेवत त्यांनी प्रशासनाच्या आणि आयोजकांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

हा केवळ तात्पुरता विरोध नसून हा लढा यापुढेही असाच चालू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनाला संघटनात्मक रूप देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगताना ते म्हणाले, “या लढ्याला एक संघटित रूप द्यायचे आहे आणि त्यावर नक्कीच काम करायचे आहे. सध्या हे सर्व विचाराधीन असून, सर्व गोष्टी निश्चित झाल्यावरच संघटनेबद्दल अधिकृत घोषणा करेन.”