पुणे : खुल्या वातावरणात केवळ रात्री दहानंतरच नाही, तर दिवसाही ध्वनिवर्धकांवर बंदी असावी, यासाठी ध्वनिप्रदूषणविरोधी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकसभा किंवा राज्यसभेत विधेयक मांडणार असून, काही लोकप्रतिनिधी संपर्कात असल्याचा दावा विद्यानंद बापट यांनी केला. कायद्यातील दुरुस्ती आणि त्याच्या कडक अंमलबजावणीसाठी न्यायालयातही याचिका दाखल करणार असल्याचे बापट यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
उत्सवात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठवून प्रकाशात आलेले विद्यानंद बापट यांचा ध्वनिप्रदूषणाविरोधातील लढ्याचे स्वरूप गणेशोत्सवानंतर कशा प्रकारचे असेल, याविषयी ‘लोकसत्ता’ने बापट यांच्याशी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला संवाद साधला.
बापट म्हणाले, ‘पोलिसांनी लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये – चार बेस-चार टॉप आणि काही डेसिबल – काही तरी केल्यासारखे दाखवण्याचा प्रकार आहे. मूलगामी बदलांसाठी त्यात काहीच उपाय नाहीत. या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे सोपे नाही आणि अंमलबजावणी झाली, तरीही नागरिकांची सुटका होणार नाही. पेठांमधील नागरिक आपली राहती घरे सोडून चालले आहेत. त्यामुळे वरचेवर मलमपट्टी करण्याला अर्थ नाही.’
‘खुल्या वातावरणात रात्री दहानंतरच नाही, तर संपूर्ण दिवसभर २४ तास ध्वनिवर्धकांना परवानगी देताच कामा नये, अशा प्रकारच्या सूचना याआधीही देण्यात आल्या आहेत. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांना परवानग्या देण्याचे अधिकार आहेत, अशा प्रकारची एक पळवाट शोधली जाते. आताच्या कायद्यातील ही पळवाट बुजवली, की जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलीस आयुक्त यांनाही अशा प्रकारच्या हास्यास्पद परवानग्या देता येणार नाहीत. त्यांच्या अधिकार क्षेत्रातच हे राहणार नाही. त्यासाठी आम्ही कायद्यातच बदल करून घेण्याच्या प्रयत्नात आहोत,’ असे त्यांनी नमूद केले.
‘ध्वनिप्रदूषणविरोधी कायद्यात लोकसभा किंवा राज्यसभा नाही, तर न्यायपालिकेच्या माध्यमातून बदल करवून घेऊ. कायदेमंडळात एक विधेयक मांडू. त्यासाठी काही लोकप्रतिनिधी संपर्कात आहेत. त्यावर विचार करत असून, निर्णय पक्का झाल्यानंतर जाहीर करू. न्यायालयीन मार्गानेही लढा देणार असून, खुल्या वातावरणात ध्वनिवर्धकांना २४ तास परवानगी नको, यासाठी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे,’ असेही बापट यांनी सांगितले.
‘आव्वाज कमी नाहीच’
‘पुण्यातील गणेशोत्सवात यंदा ‘आव्वाज’ कमी झाला नाही. मंडळांनी ध्वनिवर्धक बंद करावा, यासाठी रात्री १२ नंतर ११२ क्रमांकावर संपर्क साधून प्रयत्न केले. विसर्जनाच्या दिवशीही आव्वाज कमी होण्याची अपेक्षा नाही,’ असे विद्यानंद बापट यांनी नमूद केले.
‘तूर्तास राजकारणात नाही’
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विद्यानंद बापट यांच्या उमेदवारीविषयी ॲड. असीम सरोदे यांनी समाज माध्यमांवर भाष्य केले होते. त्यावर विद्यानंद बापट म्हणाले, ‘प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. राजकारणामध्ये विचारांना अनेक मर्यादा येतात. त्यामुळे सध्या तरी राजकारणात जाण्याचा विचार नाही.’
