पुणे : ‘मारहाणीमुळे निश्चय ढळणार नाही. मला मारहाण करणाऱ्यांना मी गांभीर्याने घेत नाही. मी मांडत असलेल्या मुद्द्यांचा तार्किक प्रतिवाद करण्याऐवजी टीका आणि मारहाण केली जात आहे. ध्वनिप्रदूषणाविराेधात माझा लढा सुरू राहणार आहे,’ असे विद्यानंद बापट यांनी शुक्रवारी सांगितले.
गणेशोत्सवात वापरल्या जाणाऱ्या ध्वनिक्षेपक यंत्रणेविरोधात कठोर कारवाईची मागणी करणारे विद्यानंद बापट यांना गुरुवारी (३ एप्रिल) मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संतोष चव्हाण (रा. राऊतवाडी, कोथरूड) याला अटक केली. मारहाणीच्या घटनेनंतर बापट शुक्रवारी प्रसारमाध्यमांसमोर आले.
‘सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण होत आहे. उत्सवांमुळे होणाऱ्या कोंडीचा त्रास नागरिकांना होत आहे. मारहाणीच्या घटनेनंतर माझा निश्चय ढळणार नाही. ध्वनिप्रदूषणाबाबत माझा लढा सुरू राहणार आहे. पुणे शहर हे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मत मांडणाऱ्या नागरिकाला मारहाण केली जाते. ही कोणती संस्कृती,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मोर्चात सहभागी होणार
‘या लढ्याला संघटनात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या दृष्टीने विचारही करण्यात येत आहे. ध्वनिप्रदूषणाविरोधात रविवारी (६ सप्टेंबर) डेक्कन जिमखाना येथील नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकातून काढण्यात येणाऱ्या माेर्चात सहभागी होणार आहे. बंदिस्त जागेत ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यास हरकत नाही. सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक लावल्याने नागरिकांना त्रास होतो. सक्तीचे श्रोते तयार केले जातात. नागरिकांना गृहीत धरता कामा नये. माझ्या वक्तव्यामुळे भावना दुखाविल्या, असा कांगावा केला जातो. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून अनेक प्रश्न सोडविले जाऊ शकतात. मी कोण आहे, याचा विचार न करता तार्किक प्रतिवाद करायला हवा. सार्वजनिक उत्सव साजरे करताना ध्वनिप्रदूषण होणार नाही, तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी,’ असे विद्यानंद बापट नमूद केले.
