पुणे : पुण्यात डीजे आणि अनधिकृत ध्वनिक्षेपकांविरोधात लढा देणारे विद्यानंद बापट सध्या त्यांच्या मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे आणि अभ्यासपूर्ण भूमिकेमुळे सर्वत्र चर्चेत आहेत. थेट मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या भाषेचे विशेष कौतुक केले आहे. मात्र, इतकी शुद्ध, समृद्ध आणि संस्कृतप्रचुर अचूक दाखले देणारी मराठी भाषा विद्यानंद बापट कशी बोलतात? त्यांची ही वैचारिक जडणघडण कशी झाली? यामागील पैलू त्यांचे वडील सुहास बापट यांनीच उलगडून दाखवले आहेत.

जन्माने पुणेकर, रमणबागेत शिक्षण

सुहास बापट यांनी दिलेल्या माहितीनुसार, बापट यांचे कुटुंब मूळ पुणेकरच आहे. विद्यानंद यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पुण्यातच झाले. पहिली ते चौथीपर्यंत त्यांनी नवीन मराठी शाळेत शिक्षण घेतले, तर त्यांचे नववीपर्यंतचे शिक्षण रमणबाग प्रशालेत झाले. त्यानंतर कौटुंबिक कारणास्तव हे कुटुंब रत्नागिरीतील मूळ गावी स्थायिक झाले. तेथे फाटक हायस्कूलमधून नववी-दहावी पूर्ण केल्यानंतर विद्यानंद यांनी रत्नागिरीच्या प्रसिद्ध गोगटे महाविद्यालयामधून वाणिज्य शाखेतून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

वाचनाचे वेड; ग्रंथालयात तासन् तास मनन

विद्यानंद यांचे भाषेवर प्रभुत्व असण्यामागे त्यांची वाचनाची प्रचंड आवड कारणीभूत आहे. अगदी इयत्ता दुसरीमध्ये असल्यापासूनच त्यांना वाचनाचा छंद जडला. पुण्यात असताना पुणे मराठी ग्रंथालयात जाऊन ते तासन् तास वाचनात मग्न व्हायचे आणि मनन करायचे. एस. एम. जोशींचे साहित्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यघटनेवरील लेखन, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. सर्व विचारसरणींच्या पुस्तकांचा सखोल अभ्यास हीच त्यांच्या भाषेची आणि विचारांची खरी ताकद ठरली असल्याचे सुहास बापट सांगतात.

ही तर दैवी शक्ती आणि जिद्द!

विद्यानंद बापट यांच्या या भाषा कौशल्याबद्दल बोलताना त्यांचे वडील सुहास बापट अत्यंत अभिमानाने सांगतात, ‘आम्ही काही वेगळे बाळकडू दिले नाही. तो लहानपणापासूनच स्वतः मन लावून वाचायचा आणि विचार करायचा. खरे सांगायचे, तर ही त्याच्यातील एक दैवी शक्तीच आहे. त्याची जिद्द, चिकाटी आणि धाडस यामुळेच तो आज कोणत्याही विषयावर अत्यंत अभ्यासू आणि रोखठोक भूमिका मांडू शकतो.’

‘आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या मराठी भाषेचे कौतुक होत असले, तरी या समृद्ध भाषेचा पाया त्यांच्या बालपणीच्या वाचनसंस्कृतीत रचला गेला,’ असे सुहास बापट यांनी सांगितले.