पुणे : ढोल-ताशांचा गजर, वारकऱ्यांची वेशभूषा आणि पुढे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची प्रतिकृती… अशा भक्तिमय वातावरणात हडपसरच्या विघ्नहर्ता ढोल-ताशा पथकाने तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत अनोखी पालखी साकारली.
विशेष म्हणजे, या पालखीबरोबर आणलेल्या खेळण्यांच्या गाडीत २०० खेळणी ठेवण्यात आली आहेत. मिरवणुकीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या लहान मुलांना ही खेळणी देऊन पथकाने गणेशोत्सवाच्या आनंदात चिमुकल्यांचाही सहभाग करून घेतला
पथकाचे वरद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा प्रथमच पथकाने पालखीची संकल्पना साकारली आहे. यामध्ये पालखीच्या पुढे घोड्यावर चोपदार (दंडेकरी) दाखवण्यात आले आहेत. त्यानंतर पालखीच्या धर्तीवर खेळण्यांची गाडी तयार करण्यात आली. पथकातील सर्व वादकांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली . त्याचबरोबर वीणेकरी आणि टाळकरी यांचा स्वतंत्र समूहही या संकल्पनेचा भाग आहे.
मिरवणुकीत ढोल-ताशांच्या तालावर वादन सुरू असताना खेळण्यांची ही गाडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गाडीत सुमारे २०० खेळणी ठेवण्यात आली मिरवणुकीच्या मार्गावर दोन्ही बाजूंना उपस्थित असलेल्या लहान मुलांना ही खेळणी वाटण्यात येत आहेत. खेळणी घेण्यासाठी मुले पुढे येत आहेत. ढोल-ताशांच्या गजराबरोबरच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले. यंदा प्रथमच हा उपक्रम राबवण्यात आल्याचे पथकातील कार्यकर्त्यांनी सांगितले.
पालखीची प्रतिकृती, वारकऱ्यांची वेशभूषा, वीणेकरी-टाळकरींचा समूह आणि खेळण्यांची गाडी यामुळे पथकाची संकल्पना लक्षवेधी ठरली. पारंपरिक वादनाला सामाजिक आणि आनंददायी उपक्रमाची जोड देत विघ्नहर्ता ढोल-ताशा पथकाने विसर्जन मिरवणुकीत आपली वेगळी छाप पाडली.
