पुणे : कोल्हापुरातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सतर्कतेचे आदेश दिले आहे. रात्री उशीरापर्यंत शहरातील घडमोडींवर लक्ष ठेवण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त कर्णिक यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत.
हेही वाचा >>> पिंपरी महापालिकेच्या सहायक उद्यान निरीक्षकाला लाच घेताना पकडले




कोल्हापुरात बुधवारी (७ जून) तणाव निर्माण झाला. दंगलसदृश परिस्थितीमुळे कोल्हापुरात जनजीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. पोलीस ठाण्यातील प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. समाजमाध्यमातील संदेशांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी रात्री उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात थांबावे, असे आदेश देण्यात आले आहे. समाजमाध्यमातून आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.