शिकायचे ते कामे करत-करत, मातीत हात घालून आणि हात चालवूनच.. शिकण्याच्या या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून पाबळच्या (जि. पुणे) विज्ञान आश्रमाने औपचारिक शिक्षणाच्या परिघाबाहेर असलेल्या शेकडो मुलांना स्वत:च्या पायावर उभे केले. आश्रमाने मुलांच्या सर्जनशीलतेला वाव दिला, त्याचबरोबर समाजाच्या गरजा पूर्ण करेल असे तंत्रज्ञान विकसित करून शिक्षणाची उपयुक्तताही सिद्ध केली आहे. ही शिक्षण पद्धती समाजात आणखी रुजविण्याच्या कामात आश्रमाला समाजाचा हातभार हवा आहे.
श्रम.. प्रतिष्ठा अन् प्राप्ती!
पाबळ येथे डॉ. श्रीनाथ कलबाग यांनी १९८३ साली विज्ञान आश्रम सुरू केला. तो पुण्यातील भारतीय शिक्षण संस्थेचा भाग म्हणून कार्यरत आहे. त्यामागचा उद्देश होता- ‘शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास.’ गेल्या ३१ वर्षांच्या काळात आश्रमाने अनेक विद्यार्थी घडविले आहेत. त्यापैकी बहुतांश मुले औपचारिक शिक्षण पद्धतीत अपयशी ठरलेली होती. मात्र, आश्रमात त्यांच्यातील कौशल्यांना वाव मिळाला. त्यांनी समाजाच्या विविध गरजा भागविणारी अनेक उपकरणे, यंत्रे विकसित केली. या ठिकाणी अभियांत्रिकी, ऊर्जा-पर्यावरण, शेती-पशुपालन, गृह आणि आरोग्य या चार प्रमुख शाखांचे शिक्षण दिले जाते; सर्व शिक्षण अर्थातच प्रत्यक्ष काम करत-करतच! या शिक्षणासाठी आठवी इयत्ता ही शैक्षणिक पात्रता आहे. त्यासाठी आसपासच्या ग्रामीण भागांतून तसेच देशाच्या विविध भागांतून विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी उद्योजक किंवा कुशल कारागीर म्हणून स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत. या शिक्षण पद्धतीला शासनमान्यता लाभली असून, देशातील अनेक शाळांमध्ये औपचारिक शिक्षणाबरोबरच अशा प्रकारे शिक्षण दिले जाते.
केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, आशा फॉर एज्युकेशन, लेन्ड अ हँड इंडिया अशा संस्थांच्या मदतीने आश्रम आपले कार्यक्रम राबवत आहे. आश्रम हे ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ‘कपार्ट’चे टेक्नॉलॉजी रीसोर्स सेंटर म्हणूनही कार्यरत आहे. याचबरोबर देशविदेशातील आघाडीच्या तंत्रज्ञान संस्था विज्ञान आश्रमाच्या कामामुळे आकर्षित झाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे जगप्रसिद्ध ‘मॅसेच्युसेटस् इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (एमआयटी). या संस्थेने विज्ञान आश्रमात ‘फॅब लॅब’ उभी केली आहे. त्याद्वारे आपल्या मनातील अनेक कल्पनांना तंत्रज्ञानाद्वारे प्रत्यक्ष रूप देता येते. संस्थेला मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी म्हणून आर्थिक पाठिंबा आवश्यक आहे.