पुणे : ‘ज्येष्ठ नाटककार वसंतराव कानेटकर यांचे ‘तू तर चाफेकळी’ हे बाककवी यांच्या जीवनावरचे नाटक ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’ संस्था करणार होती. या नाटकाचे दिग्दर्शन सिनिअर केंकरे यांच्याऐवजी (दामू केंकरे) मी करावे, असे ठरले.
नाटकाचे वाचन झाल्यानंतर मला त्यातील काही प्रसंगांसंदर्भात स्पष्टीकरण हवे होते. रामकृष्ण नायक यांच्या आदेशानुसार मी नाशिकला गेलो होतो. त्यावेळी त्यांच्याशी चर्चा झाली खरी. पण, तरी माझे समाधान झाले नाही. शेवटी ‘नाटक दामूला करूदेत. तुला जमेल असे वाटत नाही,’ असे सांगून नायक यांनी यावर पडदा टाकला. कदाचित तेव्हा मी ‘रिजिड’ असल्याने कानेटकरांचे मोठेपण समजू शकलो नाही,’ अशी प्रांजळ कबुली ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी रविवारी दिली.
ज्येष्ठ लेखक- नाटककार वसंत कानेटकर यांच्या रौप्यमहोत्सवी स्मृती वर्षानिमित्त विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या वतीने आयोजित ‘वसंत स्मृती’ महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात केंकरे बोलत होते. प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते, ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे, स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, इन्स्पायरर्स ट्राइब प्रकाशवाटा फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष गणेश चाफेकर, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन आणि विदिशा विचार मंचच्या संचालक ममता क्षेमकल्याणी या वेळी उपस्थित होत्या.
केंकरे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज ते बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित अशी कानेटकरांच्या नाटकाची व्याप्ती प्रचंड मोठी होती. वसंतरावांच्या नाटकांतून त्यांचा विषयाचा अभ्यास दिसून येतो आणि त्याबरोबरीने त्या पात्रातील माणूसही दिसतो. त्यांनी नाटकांमधून वास्तववाद रुजवला. कानेटकरांची जी नाटके गाजली नाहीत त्याही नाटकांचा विचार होणे आवश्यक आहे. ‘वेड्याचं घर उन्हात’, ‘देवांचे मनोराज्य’, ‘तू तर चाफेकळी’ आणि ‘मीरा मधुरा’ या नाटकांची पुनर्निर्मिती होणे आवश्यक आहे.
कानेटकरांनी सातत्याने लोकांसाठी नाटके लिहिली, परंतु, त्यांनी स्वतःच्या मनातील नाटके किती लिहिली हा नाट्य अभ्यासक म्हणून मला पडलेला प्रश्न आहे. मानवी संबंधावर विविध पैलूंनी भाष्य करणारी नाटके लिहिणाऱ्या वसंतरावांचे वर्णन रंगभूमी आणि प्रेक्षकांची जाण असलेला नाटककार असे करता येईल. वरांत कानेटकर हे मराठी रंगभूमीवरचे सर्वश्रेष्ठ नाटककार आहेत.’
वंदना गुप्ते म्हणाल्या, ‘माझा नाटयप्रवास हा कानेटकरांच्या नाटकांपासूनच सुरु झाला. माझे बौद्धिक आणि भावनिक भरणपोषण वसंतरावांच्या नाटकांवर झाले.’
वसंत कानेटकर हे नाट्य क्षेत्रातील केवळ नाव नसून ते एक ‘स्कूल’ आहे. कानेटकर मला गुरुस्थानी होते आणि त्यांचा शिष्य म्हणवून घेण्यात मी कृतार्थता मानतो. कारण मी कानेटकरांच्या नाट्यधर्मी कुळातील आहे. – सुरेश खरे, ज्येष्ठ नाटककार.
