Vijay Kumbhar Demand Parth Pawar Arrest : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील ४० एकर जमिनीच्या विक्री प्रकरणातील सुत्रधार आरोपी शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली आहे. मात्र, “या प्रकरणात संशयाला वाव आहे”, असं वक्तव्य माहिती अधिकार कार्यकर्ते (आरटीआय कार्यकर्ते) विजय कुंभार यांनी केलं आहे. कुंभार यांनीच मुंढव्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरण बाहेर काढलं होतं.
विजय कुंभार म्हणाले, “पुढच्या आठवड्यात विधानसभेचं अधिवेशन होत असून या अधिवेशनात मुंढव्यातील जमीन गैरव्यवहारावरून गोंधळ होऊ नये म्हणून ही अटक केल्याची शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे तेजवानी यांना अटक झाल्याबद्दल खूश व्हायचं काही कारण नाही. मुळात या अटकेला टाळाटाळ का केली जात होती असा प्रश्न उपस्थित करायला हवा. तसेच आता दिग्विजय पाटील व पार्थ पवारांनाही अटक करायला हवी.”
अधिवेशनात गोंधळ होऊ नये म्हणून शीतल तेजवानींना अटक : विजय कुंभार
माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार म्हणाले, “शीतल तेजवानी यांना अटक झाली आहे ही चांगली गोष्ट असली तरी ज्या पद्धतीने आणि ज्या वेळी ही अटक झाली आहे ते सगळं पाहता संशयाला वाव आहे. कारण दोन-तीन दिवसांत महाराष्ट्राच विधानसभेचं अधिवेशन चालू होणार आहे. या अधिवेशन काळात मुंढव्यातील जमीन गैरव्यवहारावरून गोंधळ होऊ नये म्हणून शीतल तेजवानी यांना अटक केली असावी.”
“अटकेची सुई आता पार्थ पवार व दिग्विजय पाटील यांच्यापर्यत आली पाहिजे. कारण एका कंपनीचा संचालक येतो, एवढा मोठा गुन्हा करतो, त्याच्यावर कारवाई केली जाते. मात्र, या प्रकरणातील त्याच्या इतर साथीदारांवर कारवाई होत नाही. ही कारवाई पाहता कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे असं वाटतं. या लोकांची खूप वेगळ्या पद्धतीने सरबराई केली जात आहे. अशाने या प्रकरणाचा छडा लागणार नाही.”
जमीन गैरव्यवहारप्रकरणी केले्लया पोलीस चौकशीत तेजवानीचा सहभाग असल्याचे उघडकीस आल्याने शीतल तेजवानी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अमेडिया’ कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना नोटीस बजाविण्यात आली असून, ते अद्याप जबाब नोंदविण्यासाठी हजर राहिलेले नाहीत.
