राष्ट्रवादीत केवळ दारूवाले आणि वाळूचोर – विजय शिवतारे

पैशाच्या जीवावर सत्ता आणणे आणि सत्तेच्या जोरावर पैसा कमवणे हीच राष्ट्रवादीची नीती आहे,राष्ट्रवादीची घराणेशाही मोडून काढा, अशी टीका शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी थेरगावात बोलताना केली.

राष्ट्रवादीत केवळ दारूधंदा करणारे आणि वाळूचोर लोकांचा भरणा झाला आहे. पैशाच्या जीवावर सत्ता आणणे आणि सत्तेच्या जोरावर पैसा कमवणे हीच राष्ट्रवादीची नीती आहे, अशी टीका शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी थेरगावात बोलताना केली. राष्ट्रवादीची घराणेशाही मोडून काढा, असे आवाहनही त्यांनी केले.
मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आयोजित महिलांच्या मेळाव्यात ते बोलत होते. उपनेते शशिकांत सुतार, जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ, माजी आमदार रूपलेखा ढोरे यांच्यासह सुलभा उबाळे, अश्विनी चिंचवडे, उमा खापरे, संगीता पवार, निर्मला केंढे, कांता मोंढे आदी उपस्थित होते.
शिवतारे म्हणाले, मावळातील लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. महिलांची ताकद ज्यांच्यामागे असते, त्यांना कोणीही पराभूत करू शकत नाही. मी आमदार झालो, ते महिला शक्तीमुळेच. राष्ट्रवादीने कधीही महिलांचा विचार केला नाही. ५० टक्के आरक्षण दिले म्हणजे काम झाले, अशीच त्यांची धारणा आहे. राष्ट्रवादीची घराणेशाही मोडून काढण्याचे आणि सत्तापरिवर्तनाचे महत्त्वाचे काम हीच महिलाशक्ती करणार आहे. सुतार म्हणाले, महिलाशक्ती बदल घडवू शकते आणि बदल घडवण्याची वेळ आली आहे. देशाला खंबीर नेतृत्व मिळवून देण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याची गरज आहे. त्यासाठी कष्ट सोसलेला सामान्य उमेदवार महायुतीने दिला आहे, त्यांना निवडून देण्याचे आवाहन सुतार यांनी केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vijay shivtare criticises ncp

ताज्या बातम्या