पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आठ – दहा वर्षे यात वाया घालवू नयेत,’ असा महत्त्वपूर्ण सल्ला डॉ. दिव्यकीर्ती यांनी दिला. ‘परीक्षेची पूर्ण तयारी करण्यासाठी फक्त दोन वर्षे द्या. दोन वर्षे पूर्ण निष्ठेने अभ्यास केल्यानंतर दिवसातून केवळ दोन तास सरावासाठी द्यावेत आणि उरलेल्या वेळेत नोकरी किंवा व्यवसाय सुरू करावा. यामुळे तुमचे वय, कारकीर्द आणि आर्थिक गणित सुरक्षित राहते व मानसिक तणाव येत नाही,’ असे दिव्यकीर्ती यांनी स्पष्ट केले. डॉक्टर विकास दिव्य कीर्ती यांची दृष्टी आयएएस या संस्थेची शाखा पुण्यात सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला.

“सरकारने एमपीएससीचा वेळेत निकाल लावून नोकऱ्या द्याव्यात!”

‘वेळेवर परीक्षा, भरती न होणे, निकालांचा खोळंबा, न्यायालयात गेलेली प्रकरणे आदींमुळे परीक्षार्थी मानसिक तणावाखाली जात आहेत; त्यामुळे सरकारने तातडीने हस्तक्षेप करून वेळेत निकाल लावावेत आणि विद्यार्थ्यांना हक्काच्या नोकऱ्या द्याव्यात,’ अशी अपेक्षा माजी सनदी अधिकारी आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक डॉ. विकास दिव्यकीर्ती यांनी व्यक्त केली.

‘लोकसेवा आयोगाचा कारभार व्यवस्थित करून ठरलेल्या वेळापत्रकानुसारच भरती प्रक्रिया पूर्ण करणे ही पूर्णपणे राज्य सरकारची जबाबदारी आहे,’ असेही त्यांनी नमूद केले. ‘एमपीएससी’च्या मुख्य परीक्षेच्या स्वरुपाबाबत ते म्हणाले, ‘बहुतांश राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा वर्णनात्मक स्वरुपाच्या असून, ते अधिक योग्य मानले जाते, राजस्थानात वर्णनात्मकबरोबरच पर्यायी प्रश्नपत्रिका असते. या दोन्हींची सांगड घातली जाते. महाराष्ट्रात राज्य सरकार ज्या पद्धतीचे स्वरुप देईल, त्या प्रमाणे आम्ही शिकवू.’

गेल्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मराठी भाषेतून परीक्षा देणारा एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही. प्रादेशिक भाषांवर दिव्यकिर्ती म्हणाले, ‘२०११ नंतर बदललेल्या स्वरुपामुळे विद्यार्थ्यांनी इंग्रजी किंवा हिंदी भाषेवर पकड मिळवून सराव करणे अधिक फायद्याचे ठरेल. हा प्रश्न केवळ महाराष्ट्रातील मराठी भाषेचा नाही तर देशभरातील प्रादेशिक भाषांमध्ये हीच अवस्था आहे विद्यार्थी प्रादेशिक भाषांमध्ये अभ्यास करत असले तरी उत्तीर्ण होण्याचा टक्का नगण्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता मराठी आणि हिंदी या भाषांवर प्रभुत्व मिळवणे गरजेचे आहे.