विक्रम गोखले यांचा नवोदितांना गुरुमंत्र

अभिनय म्हणजे केवळ संवादफेक नव्हे. त्यासाठी भाषेवर प्रभुत्व हवे आणि चेहऱ्यावर हावभाव असले पाहिजेत. लेखनातील बारकावे कळण्यासाठी नटाने वाचन केले पाहिजे. अभिनय कला ही मोठी साधना आहे. ती जोपासल्याखेरीज नट हा अभिनयातील नटसम्राट होत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी नवोदित कलाकारांना गुरुमंत्र दिला.

क्यूब नाईन आणि एच. आर. झूम फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अभिनय कला कशी जोपासावी, तसेच अभिनयाचे विविध पैलू यावर विक्रम गोखले यांनी नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या माध्यमातून उदयोन्मुख कलाकारांनी गोखले यांच्याशी थेट संवाद साधून आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली.

गोखले म्हणाले,‘‘नव्या उमेदीच्या कलाकारांची सध्या चित्रपटसृष्टीला गरज आहे. मी अनेक नवीन कलाकारांबरोबर काम करीत आहे. सध्याच्या पिढीतील कलाकारांमध्ये मोठय़ा प्रमाणात गुणवत्ता आहे. मात्र, त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन होत नाही. योग्य मार्गदर्शन लाभले तर अनेक नवोदित कलाकार अभिनयामध्ये आपली कारकीर्द घडवू शकतील.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कार्यकारी निर्माते संजय ठुबे, प्रसिद्ध वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, नृत्यदिग्दर्शिका निकिता मोघे, एकपात्री कलाकार संतोष चोरडिया, क्यूब नाईनचे संचालक तेजस भालेराव, एच. आर. झूम फिल्म्सचे राजाराम कोरे, जितेंद्र वाईकर, मयूर जोशी या वेळी उपस्थित होते.