पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह (शरद पवार) भाजप बंडखोर आणि अन्य अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. काकडे यांच्या विजयाची औपचारिक घोषणा येत्या २२ जून रोजी होणार आहे.
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणूक दोन्ही ‘राष्ट्रवादी’ प्रतिष्ठेची केली होती. महायुतीच्या जागा वाटपात पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) देण्यात आल्यानंतर माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव, विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केला. त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती.
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) शहराध्यक्ष, माजी आमदार सुनील टिंगरे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या गुरुवारच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीकांत पाटील यांच्यासह बंडखोर प्रदीप कंद आणि अपक्ष उमेदवारांनी गुरुवारी माघार घेतली. त्यामुळे काकडे बिनविरोध निवडून येणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी पक्षांतर्गत नाराजीही दूर केल्याने सुनील टिंगरे यांनीही गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
शरद पवार यांच्याशी संपर्कानंतर अर्ज मागे
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक पाटील विरोधात काकडे अशी होईल, अशी शक्यता होती. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बुधवारी भेट घेतली. तसेच माजी खासदार संजय काकडे यांनीही मुंबई येथे गुरुवारी सकाळी पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार पाटील यांनी अर्ज मागे घेतला.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर कंद यांची माघार
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कंद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कंद यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना केली. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यास काही अवधी बाकी असताना कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
हा विजय दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह माझ्या आई-वडिलांचा आहे. अजितदादा आज असते तर, त्यांना आनंद झाला असता. निवडणूक बिनविरोध झाली, याचा आनंद आहे. – विक्रम काकडे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
