पिंपरी : ‘सोलापूरहून एक उमेश पाटील नावाचे पार्सल आले आहे, हा व्यक्ती मी पैसे देऊन आमदार झाल्याची चर्चा करत आहे. परंतु पवार कुटुंबाला विकत घेऊन आमदार होणारा अद्याप महाराष्ट्रात जन्माला आला नाही. त्यामुळे पाटील माझ्या नादाला लागू नका. अन्यथा मी सुटी देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे विधानपरिषद आमदार विक्रम काकडे यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे मंगळवारी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार विक्रम काकडे यांचा मावळवासीयांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी काकडे यांनी पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांचा समाचार घेतला. आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे, ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे, गणेश खांडगे, गणेश ढोरे, बबनराव भेगडे, दिपाली हुलावळे यावेळी उपस्थित होते.
मी पैशांचा जीवावर आमदार झाल्याचे पाटील चर्चा करत असल्याचे सांगत आमदार काकडे म्हणाले ‘माझे आणि अजित पवारांचे संबंध काय होते यांना माहिती नाहीत. पार्थ पवार माझे लहानपनापासूनचे मित्र आहेत. आमचे नातेसंबंध वेगळे आहेत. आपल्याच पक्षातील लोक पैशांच्या जिवावर आमदार झाल्याचे बोलत असल्यामुळे मला वाईट वाटले. त्यामुळे पाटील असल्या गोष्टी बंद करा, पार्थ पवारांचे कान भरणे बंद करा. मी याकडे दुर्लक्ष करणार होतो. परंतु आपल्यावर जेव्हा आरोप होतात, त्यावर स्पष्टीकरण न दिल्यास हे आरोप खरे वाटू लागतात. त्यामुळे कृपा करून चुकीच्या गोष्टी पसरविणे बंद करा, अन्यथा यापुढे मी सुटी देणार नाही, असा इशाराही काकडे यांनी दिला. तुम्हाला पदे, आमदारकी, खासदारकी पाहिजे असेल किंवा पवारांच्या जवळ जायचे असेल तर त्यासाठी माझा वापर करू नका’, असेही काकडे म्हणाले.
कार्यकर्त्यांसाठी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद घेतले
सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार दुःखातून सावरून आपल्यासाठी काम करत आहे. सुनेत्रा पवार यांनी आपल्या कुटुंबासाठी नाही, तर आपल्या सारख्या कार्यकर्त्यांसाठी उपमुख्यमंत्री पद घेतले आहे. अजितदादांच्या निधनानंतर विधान परिषद निवडणुका झाल्या. या निवडणुका फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताकदीवर बिनविरोध झाल्या आहेत , असेही काकडे म्हणाले.
