scorecardresearch

आमदार विलास लांडे म्हणतात, आयुक्त प्रत्येक ठिकाणी आडवे जातात

आमदार विलास लांडे यांनी आयुक्तांवर टीकास्त्र सोडले आहे. आयुक्त प्रत्येक ठिकाणी आडवे जातात, अशी तक्रार त्यांनी चिंचवडला जाहीर कार्यक्रमात केली.

पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे नेते व महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्यातील ‘मधुर’ संबंध सर्वश्रुत आहेत. महापौर मोहिनी लांडे व आयुक्तांमधील संघर्ष ताजाच आहे. अलीकडेच त्यांच्यात ‘पॅचअप’ झाले असताना आता आमदार विलास लांडे यांनी आयुक्तांवर टीकास्त्र सोडले आहे. आयुक्त प्रत्येक ठिकाणी आडवे जातात, अशी तक्रार त्यांनी चिंचवडला जाहीर कार्यक्रमात केली.
आयुक्त नियमावर बोट ठेवून काम करतात म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रचंड अडचण होते. त्यावरून गेल्या वर्षभरात वादाचे अनेक प्रसंग उद्भवले, त्यातून बरेच नाटय़ही घडले. अनेकदा अजितदादांपर्यंत प्रकरण गेले. गेल्या काही दिवसांपासून वातावरण शांत होते. मात्र, चिंचवडला वारकरी संगीत संमेलनात वारकऱ्यांच्या वतीने काही मागण्या करण्यात आल्या, त्याची दखल घेत लांडे म्हणाले, आम्ही तुम्हाला खोटे आश्वासन देऊ इच्छित नाही. हे काम करू, ते करू, असे आम्ही तुम्हाला म्हणू शकतो. त्याबद्दल टाळ्या घेऊ. मात्र, ती कामे न झाल्यास तुम्ही नाराज होणार. त्याचे कारण आयुक्त आडवा आहे, प्रत्येक ठिकाणी ते आडव्यात घुसतात. अनधिकृत बांधकामांच्या ते मागे लागले आहेत. गोरगरिबांची घरे पाडत सुटले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

‘वर्गण्यांमुळे हैराण झालो’
गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी, जयंती अशा काळात वर्गण्यांमुळे अक्षरश: हैराण व्हायची वेळ येते, आमच्या अडचणी सांगायच्या कोणाकडे, असे सांगत वारकरी कधीही वर्गणी मागत नाही, ही परंपरा लक्षात घेण्याची गरज असल्याचे मत विलास लांडेंनी या वेळी व्यक्त केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-11-2013 at 02:40 IST

संबंधित बातम्या