पुणे : समाजातील सज्जनशक्ती एकत्र आली, तर सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणाची प्रक्रिया बळकट होऊ शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य हे सकारात्मक शक्तीचे संघटन करणारे असून त्यामागील संघटनशास्त्र हीच त्याची खरी ताकद आहे, असे मत माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या वतीने ‘सामाजिक परिवर्तनातून राष्ट्रनिर्माण : १०० वर्षांची वाटचाल’ या विषयावर व्याख्यानसत्रात सहस्रबुद्धे बोलत होते. माय होम इंडिया संस्थेचे सुनील देवधर, माजी खासदार प्रदीप रावत, डीईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, डीईएस पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, कार्यवाह प्रा. आनंद काटिकर आणि प्राचार्य डॉ. सुनीता आढाव उपस्थित होत्या.

सहस्रबुद्धे म्हणाले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जात विचारली जात नाही. संघाच्या कार्यात इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मीयही सहभागी होत असून विविध पार्श्वभूमीच्या लोकांची संख्या संघात आहे. समाजकार्यासाठी सातत्याने काम करण्याची प्रेरणा दिली जाते. अडचणी आल्या तरी हिंमत न हारता काम करत राहणे ही संघाची कार्यपद्धती आहे. कोणालाही विरोध करण्याची भूमिका संघाची नाही. संघाने मैत्रीची खरी व्याख्या शिकवली असून समाजात चांगले कार्य करणारे अनेक जण संघाबाहेर असले तरी तेही समाजपरिवर्तनाचे खरे कार्यकर्ते आहेत. संघाचे कार्य आज देशापुरते मर्यादित नसून जगभरात त्याबद्दल उत्सुकता निर्माण होत आहे. आफ्रिकेतील अनेक लोकांना संघाच्या कार्यपद्धतीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे.’

देवधर म्हणाले, ‘महापुरुषांना जातीच्या तुरुंगात टाकण्याच्या मानसिकतेतून समाजाने बाहेर पडणे आवश्यक आहे. फुले दाम्पत्याने महिलांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. समाजाकडून हिणवले गेले तरीही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी कधीही सुडाची भावना न ठेवता समाजकार्य केले. त्यांच्या कार्यामुळेच आज मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. आपल्या भाषेचा अभिमान बाळगणे आवश्यक असून भारतीय पोशाख आणि परंपरांनाही महत्त्व दिले पाहिजे. समाजात आंतरजातीय विवाहांना पाठिंबा देणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे प्रबोधन युगाचे अपत्य आहे. लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला राष्ट्रीय स्वरूप दिले, तर डॉ. केशव हेडगेवार यांनी समाजातील आणि धर्मातील चांगल्या गोष्टीला राष्ट्रीय स्वरूप देत संघाची उभारणी केली. संघाचे हिंदुत्व व्यापक आहे. समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी संघाची ओळख अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. – प्रदीप रावत, माजी खासदार