पुणे : सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात पंधरा ऑगस्टनंतर पूर्वहंगामी द्राक्षबागांची फळछाटणी सुरू होते. ही द्राक्ष आगाप येतात, द्राक्ष बागायतदारांना चांगले दर मिळतात. मात्र मागील दोन वर्षांपासून अवेळी आणि लहरी पावसाचा फटका बसून द्राक्ष पीक मातीमोल होत आहे. त्यामुळे यंदा पूर्वहंगामी फळ छाटणीकडे द्राक्ष बागायतदरांनी पाठ फिरवली आहे. ऑक्टोबरमध्येच फळ छाटणी घेण्याचे नियोजन बागायतदार करीत आहेत.

सांगली जिल्ह्याच्या पूर्वभागात म्हणजे तासगाव, कवठेमहांकाळ,जत, खानापूर हा भाग द्राक्ष बागायतीसाठी प्रसिद्ध आहे. परिसरातील बागायतदार सर्रास ऑक्टोबर महिन्यात फळ छाटण्या घेतात. मात्र अनेक प्रयोगशील बागायतदार द्राक्षे बाजारात नसताना आगाप यावीत, चांगला दर मिळावा म्हणून पंधरा ऑगस्टनंतर फळ छाटण्या घेतात. साधारण दोन वर्षांपासून अवेळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट या  नैसर्गिक आपत्तीमुळे आगाप द्राक्ष छाटण्या फायदेशीर ठरत नाहीत. महागडी औषधे, खते आणि रसायनांच्या फवारण्या करूनही द्राक्ष पीक मातीमोल होण्याचे प्रमाण वाढले आहे. सततच्या आर्थिक नुकसानीमुळे यंदा पंधरा ऑगस्टनंतर होणाऱ्या छाटण्या झाल्याच नाहीत. स्थानिक बागायतदार ऑक्टोबरमध्ये फळ छाटण्या घेण्याच्या मन:स्थितीत आहेत.

अगाप फळ छाटणी घेतल्यानंतर द्राक्षं लवकर बाजारात येतात. राज्यातील आणि परराज्यातील व्यापाऱ्यांकडून या आगाप द्राक्षांना चांगली मागणी असते. हिरव्या रंगाच्या चार किलोच्या पेटीचे दर साडेतीनशे, चारशे रुपयांपर्यंत जातात. आगाप छाटणी घेतलेल्या बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकांना चांगला दर मिळाला नाही. पिके  मातीमोल झाली. महागडी खते, औषधे घालून, बँकांची कर्ज काढून पीक घ्यायचे आणि तेही हाती लागत नाही, अशी स्थिती मागील दोन-तीन वर्षांपासून होत आहे. या स्थितीला कंटाळून आणि धास्तावून यंदा द्राक्ष बागायतदारांनी आगाप फळ छाटण्यांकडे पाठ फिरवली आहे.

उशिराच्या फळ छाटण्याही अडचणीच्या

ऑक्टोबर महिन्यात फळ छाटण्या घेतल्या जातात. मात्र मागील दोन-तीन वर्षांपासून दिवाळीपर्यंत पाऊस सुरूच राहत असल्यामुळे बागायतदार लवकर फळ छाटण्या घेणे टाळत आहेत. अगदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत काही शेतकरी फळ छाटण्या घेत आहेत. मात्र नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या फळ छाटण्या मार्च, एप्रिलच्या अवकाळीत किंवा गारपिटीत सापडतात. एप्रिलमध्ये बसणाऱ्या उन्हाच्या जोरदार तडाख्यामुळे द्राक्षं करपून जातात. त्यामुळे उशिराने घेतलेल्या फळ छाटण्याही फारशा फायदेशीर ठरतात, असे चित्र नाही.

दोन हंगामांना करोनाचा फटका

द्राक्षाच्या मागील दोन हंगामांना करोनाच्या टाळेबंदीचा मोठा फटका बसला. द्राक्ष बाजारात येण्याच्या काळातच फेब्रुवारी, मार्च महिन्यांत सलग दोन वर्ष टाळेबंदी असल्यामुळे द्राक्षांना बाजारात मागणीच नव्हती. त्यामुळे द्राक्षांचे दर पडले होते. त्यामुळे किमान यंदा तरी हंगाम सुरळीत पार पडावा आणि चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा द्राक्ष बागायतदार करीत आहेत.