राम गणेश गडकरी यांचे पहिले नाटक ‘संगीत गर्वनिर्वाण’ आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘बंदिश’ या नाटकांच्या पहिल्या प्रयोगासह आत्मकथा, रॉशोमॉन ब्लूज, तारामंडल अशा नाटकांची मेजवानी विनोद दोशी स्मृती नाटय़ महोत्सवात नाटय़प्रेमींना मिळणार आहे.
द विनोद अँड शरयू दोशी फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी विनोद दोशी स्मृती नाटय़ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाचे हे सहावे वर्ष आहे. २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाटय़गृहामध्ये हा महोत्सव होणार आहे. या वर्षी ‘संगीत गर्वनिर्वाण’ या राम गणेश गडकरी यांच्या पहिल्या नाटकाने महोत्सवाची सुरूवात होणार आहे. गडकरी यांचे हे नाटक या महोत्सवाच्या निमित्ताने पहिल्यांदाच रंगमंचावर येत आहे. या नाटकाचे दिग्दर्शन हृषीकेश जोशी आणि संगीत नरेंद्र भिडे यांनी दिले आहे. या महोत्सवासाठी खास निर्मिती करण्यात आलेल्या राजीव नाईक लिखित ‘बंदिश’ या नाटकाचे दिग्दर्शन मोहित टाकळकर यांनी केले आहे. या शिवाय महेश एलकुंचवार लिखित ‘आत्मकथा’, बिजन मंडल दिग्दर्शित ‘रॉशोमॉन ब्ल्यूज’ ही हिंदी नाटके आणि नील चौधरी लिखित, दिग्दर्शित ‘तारामंडल’ हे इंग्रजी नाटक पाहता येणार आहे.
संपूर्ण महोत्सवासाठी ६०० रुपये आणि ४५० रुपये किमतीच्या प्रवेशिका आहेत. प्रवेशिकांची विक्री यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे होत आहे.