पुणे: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे महासचिव विनोद तावडे यांनी पुण्यातील कार्यक्रमात महत्त्वाचे विधान केले. त्यातून तिकीट वाटपाबाबत कार्यकर्त्यांना तावडे यांनी सूचक संदेश दिला आहे. ‘पक्ष असेल तर सरकार आहे हा संदेश अटलजींनी दिला. त्यांच्यासारख्या नेत्यांनी सलगी देण्यामुळे कार्यकर्त्यांना काम करण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे तिकीट गेले, तरी बंडखोरी करावीशी वाटतच नाही,’ असे भाष्य तावडे यांनी केले.
मोरया प्रकाशनातर्फे मेधा किरीट यांनी लिहिलेल्या ‘अटलजी व्रतस्थ याज्ञिक’ या पुस्तकाचे प्रकाशन तावडे यांच्या हस्ते झाले. एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, मोरया प्रकाशनाचे कौस्तुभ देव, डॉ. सुनील भंडगे, डॉ. शिरीष सहस्रबुद्धे या वेळी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सव हे भव्य होऊ शकतो हे आधी पटले नव्हते. राज्याचा सांस्कृतिक, शिक्षणमंत्री होतो. पुस्तक महोत्सवाला पुणेकर दाद देऊ शकतात, पुस्तके पुण्याच्या डीएनएमध्ये आहे हे साने गुरुजींच्या अमळनेर येथील राजेश पांडे यांच्या लक्षात आले. दोन वर्षांतच महोत्सवाला प्रतिष्ठा मिळणे हे पुणेकरांचे श्रेय आहे. साहित्य संमेलनाला अनेक वर्षे गेलो, तिथे हल्ली कोणी वाचत नाहीत असे म्हटले जायचे.
साहित्य संमेलनात कोट्यवधींची विक्री व्हायची. वाचकांना पुस्तके हवी आहेत, त्यांच्यापर्यंत पुस्तके नेली पाहिजेत. अटलजी जितके राजकीय नेते होते, तितकेच ते साहित्यिक, कवी होते. गीतरामायणाच्या कार्यक्रमातील त्यांच्या भाषणात एकही राजकीय वाक्य नाही. मुंबईत आल्यावर अटलजी शिवाजी मंदिरला मराठी नाटक पाहायचे. अशा व्यक्तीच्या आयुष्यातील घडामोडी उलगडून सांगणे महत्त्वाचे आहे. त्यातून नव्या पिढीला काही गोष्टी शिकण्यासारखे आहे.
मुशर्रफ यांच्याबरोबरची आग्रा येथील समिट अयशस्वी ठरली होती, पण किसीने छेडा तो छोडेंगे नही हे अटलजींनी कारगिल युद्धावेळी दाखवून दिले. पक्ष असेल तर सरकार आहे हा संदेश अटलजींनी दिला. त्यामुळे तिकीट गेले, तरी बंडखोरी करावीशी वाटतच नाही. कार्यकर्त्यांना काम करण्याची ऊर्जा नेत्यांच्या सलगी देण्यामुळे मिळते.
राजकारणात ‘हेल्दी रिलेशन’ आज राहिलेले नाही. मीही विरोधी पक्षनेता होतो. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार प्रखर टिका करायचे, पण जेवायला एकत्र असायचे. अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाचे आगळेवेगळे पैलू नीट अभ्यासले पाहिजेत. अटलजींनी त्यांच्या काळात पायाभूत सुविधा निर्माण केल्या. गावापर्यंत रस्ते बांधले, सुवर्ण चतुष्कोन निर्माण केला.
देशातील ४० टक्के जनता गावाच्या बाहेरच पडत नाही. त्यांच्यासाठी मोफत धान्य, किसान सन्मान योजना, महिलांना उद्योग निर्माण करणे अशा योजनांची प्रेरणा मिळाली. नागरिकांना प्रत्यक्ष फायदा आणि अप्रत्यक्ष फायदा अशा प्रकारचे राजकारण महत्त्वाचे आहे. २०४७ला देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील, त्यावेळचा भारत कसा असेल याची कल्पना अटलजींनी केली असावी, असेही तावडे यांनी सांगितले.
