क्रिकेटच्या मैदानात आपल्या दमदार खेळीने क्रिकेटरसिकांचे मन जिंकलेल्या विराट कोहलीने शुक्रवारी पुण्यातील ‘आभाळमाया’ वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील आजी-आजोबांचे मन जिंकले. विराटने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांशी मनमोकळा संवाद साधला आणि मदतीचा हात देखील पुढे केला. विराटच्या आर्थिक मदतीमुळे या संस्थेला मोठा आधार मिळाला आहे.
दरम्यान, कोहलीला पाहून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक हरकून गेले. पुण्याच्या सिंहगड रोडवर हे ‘आभाळमाया’ वृद्धाश्रम असून येथे सध्या ५७ ज्येष्ठ नागरिक वास्तव्याला आहेत. डॉ.अपर्णा देशमुख यांनी या वृद्धाश्रमाची स्थापना केली होती. डॉ.अपर्णा वृद्धांसाठी करत असलेले काम अत्यंत कौतुकास्पद असून, घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घेणं हे आपले कर्तव्य असल्याची भावना यावेळी विराटने व्यक्त केली. दुसरीकडे पुणे सुपरजायंट्सचे अजिंक्य रहाणे, इरफान पठाण आणि इशांत शर्मा यांनी पुण्याच्या केईएम रुग्णालयातील लहानग्यांची भेट घेतली. या तिघांना पाहून बच्चेकंपनी खुश झाली होती.