पुणे : भर चौकात वादातून एकावर पिस्तूल रोखणाऱ्या सराइताला विश्रांतवाडी पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याकडून इटालियन बनावटीचे पिस्तूल, तसेच एक काडतूस जप्त करण्यात आले. विश्रांतवाडी पोलीस, तसेच गस्त घालणाऱ्या ‘काॅप्स २४’ योजनेतील पोलीस कर्मचाऱ्यांना वादावादी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्वरित घटनास्थळी धाव घेऊन सराइताला पकडल्याने अनर्थ टळला.

तौफिक ऊर्फ रकीब रफीक शेख (वय ३२, रा. श्रमिक वसाहत, सावंत पेट्रोल पंपासमोर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख याच्याविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. विश्रांतवाडीतील टिंगरेनगर भागात ४ जून रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास दोघांमध्ये वाद सुरू असून, एकाने त्याच्याकडील पिस्तूल काढून रोखल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला नागरिकांनी कळविली.

त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांचे पथक आणि ‘काॅप्स २४’ योजनेंतर्गत गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिस्तूल ताब्यात घेण्यात आले. शेख याच्याकडील पिस्तूल इटालियन बनावटीचे असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी पिस्तुलासह एक काडतूस जप्त केले. जप्त केलेले पिस्तूल ५० हजार रुपयांचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेख याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन शेखला पकडल्याने अनर्थ टळला. शेख याच्याकडे शस्त्र परवाना नाही. त्याने परदेशी बनावटीचे पिस्तूल कोठून आणले, या दृष्टीने तपास सुरू आहे. त्याने पिस्तूल चोरल्याचा संशय आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, बबन वणवे, यशवंत किर्वे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, विशाल गाडे, धवल लोणकर, संदीप देवकाते, तसेच गस्त घालणारे पोलीस कर्मचारी लंघे आणि माळी यांनी ही कामगिरी केली. पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांनी तपास पथकाने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.