पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराचा कोणत्याही ऐतिहासिक दस्तामध्ये उल्लेख नाही; तसेच ‘संभाजी’ या कादंबरीमधील उल्लेख पूर्णत: काल्पनिक असून जना परीटीण, गोविंद नाक, दामाजी पाटील, पाटलीण असे उल्लेखही काल्पनिक असल्याची कबुली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी उलटतपासणीत दिली.

कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर विश्वास पाटील यांची राज्य शासनाचे विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांनी शुक्रवारी दिवसभर सुनावणी घेतली. त्यावेळी ॲड. हिरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी कादंबरीतील उल्लेख काल्पनिक असल्याचे मान्य केले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘संभाजी’ या कादंबरीमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्कारावरून वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार विशिष्ट समाजातील व्यक्तीने केल्याची भूमिका घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एक जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्या दंगलीच्या संदर्भात कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर सुनावणी सुरू आहे.

ॲड. शिशिर हिरे यांनी उलटतपासणी घेताना पाटील यांना काही प्रश्न विचारले. त्यावेळी ‘संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तात उल्लेख नाही. ‘संभाजी’ या कादंबरीमधील जना परटीण, गोविंद नाक, दामाजी पाटील, पाटलीण हे उल्लेख पूर्णपणे काल्पनिक आहेत,’ असे पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.‘संभाजी ही कादंबरी भूभाग आणि काही तथ्य यावर आधारित कल्पना विलास आहे,’ असे पाटील यांनी सांगितल्याची माहिती ॲड. हिरे यांनी दिली.

‘कादंबरीतील लिखाणाचा गैरवापर करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते निषेधार्थ आहे,’ असेही पाटील यांनी उलटतापसणीवेळी सांगितल्याचे ॲड. हिरे यांनी स्पष्ट केले.

जेधे शकवली, मासीरे आलमगिर, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान या तत्कालीन इतिहासकारांचा उल्लेख करत विश्वास पाटील यांच्या ‘संभाजी’ कादंबरीमधील कल्पनाविलासाचा फोलपणा कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर मांडण्यात आला.

-ॲड. शिशिर हिरे