पुणे : रामटेकडी परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने भिरकावलेल्या दगडामुळे एका २६ वर्षीय तरुणीच्या डोळ्याच्या बाजूला गंभीर दुखापत झाली. त्यात तिची दृष्टी अधू आली. डॉक्टरांच्या पथकाने गेल्या सहा महिन्यांपासून विविध शस्त्रक्रिया आणि उपचारांद्वारे तिची दृष्टी पुन्हा आणण्यात यश मिळविले आहे.
याबाबत नोबेल हॉस्पिटलमधील प्लॅस्टिक सर्जन डॉ. रवी स्वामिनाथन म्हणाले, की ही तरुणी एका माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कंपनीत नोकरी करते. साधारणपणे सहा महिन्यांपूर्वीची ही घटना आहे. ती दुचाकीवर मागे बसली होती. त्या वेळी दगड लागल्याने तिच्या डोळ्याजवळ गंभीर इजा झाली. तिच्या डोळ्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता आणि चेहऱ्याचे हाडही तुटले होते. त्याचा थेट परिणाम डोळ्यांकडून मेंदूकडे संवेदना पोचविणाऱ्या नसेवर (ऑप्टिक नर्व्ह) झाला होता. त्यामुळे तिची दृष्टीही गेली होती. चेहऱ्यावरच्या गंभीर जखमांमुळे गुंतागुंत वाढली होती.
हेही वाचा – पुणे : खडकवासला धरणातून पुन्हा पाणी सोडण्यास सुरुवात
कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. सुधीर हलिकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तरुणीवर ‘एण्डोस्कोपिक ऑप्टिक नर्व्ह डिकम्प्रेशन’ प्रक्रिया केली. यात डोळे आणि मेंदूच्या नसांच्या मागे असलेली पोकळी खुली करण्यात आली. त्यात यश मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात, फनेलच्या आकाराच्या असलेल्या ऑप्टिक कॅनालवरील हाडाचा भाग काढण्यात आला. त्यातून नसेवरील (ऑप्टिक नर्व्ह) ताण कमी झाला. त्यानंतर पहिल्या टप्प्यात डोळ्याला आधार देणारे हाड कापून टाकण्यात आले होते. मात्र, या नेत्र कक्षामध्ये आधाराची गरज असते आणि पुन्हा हाडांचा वापर केला, तर दाब वाढला असता, त्यामुळे टायटॅनिअम प्लेटचा वापर करून हा आधार देण्यात आला, असे डॉ. स्वामिनाथन यांनी सांगितले.
कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. सुधीर हलिकर, प्लॅस्टिक सर्जन डॉ. रवी स्वामिनाथन आणि डॉ. मनोज पवार आणि नेत्रतज्ज्ञ डॉ. सचिन बोधले यांनी या तरुणीवर उपचार केले. त्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांत तिच्यावर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने त्याचा पाठपुरावा करण्यात आला. ही तरुणी ऑगस्टमध्ये पुन्हा पाठपुराव्यासाठी आली. त्या वेळी तिच्या चेहऱ्यावरील जखमा जवळपास पूर्ण बऱ्या झाल्या होत्या.
एण्डोस्कोपिक ऑप्टिक नर्व्ह डिकम्प्रेशन प्रक्रिया
ऑप्टिक नर्व्ह ही मेंदूपासून कवटीमधून डोळ्यांपर्यंत विस्तारलेली असते. या नसेचा एक भाग कवटीमधील कठोर हाडांच्या भागातही असतो. एखादी गंभीर जखम, अपघात किंवा त्या जागेत वाढलेल्या गाठीमुळे ऑप्टिक नर्व्हवरचा दाब वाढतो. त्यातून रुग्णाची दृष्टी जाण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ऑप्टिक नर्व्हवरील दाब कमी करणे महत्त्वाचे असते. ‘एण्डोस्कोपिक ऑप्टिक नर्व्ह डिकम्प्रेशन’च्या माध्यमातून कान-नाक-घसा तज्ज्ञ ही कमीत कमी छेद असलेली प्रक्रिया करतात.