पालखी सोहळा आणि रमजान असा योग साधून विठुनामाच्या गजरात वारकरी आणि मुस्लीम बांधवांच्या उपस्थितीत शनिवारी (११ जुलै) रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या पालखीचे शुक्रवारी पुण्यनगरीमध्ये आगमन होत आहे. भागवत संप्रदायाचा पालखी सोहळा आणि मुस्लिमांचा रमजान असा दुहेरी योग यंदा जुळून आला आहे. हे औचित्य साधून साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरातर्फे शनिवारी विठुनामाच्या गजरात रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नाना पेठ येथे शनिवारी सायंकाळी ज्ञानेश्वरी, गाथा, कुराण, बायबल, गुरू ग्रंथसाहिब या धर्मग्रंथांसह भारताच्या राज्यघटनेचे पूजन केले जाणार आहे. त्यानंतर वारकरी मंडळी भारूड आणि भजने सादर करणार असून ७ वाजून १९ मिनिटांनी रोजा इफ्तार कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर आणि भाई कात्रे यांनी गुरुवारी दिली.
मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणेच शनिवारी दिवसभर वारक ऱ्यांना भोजन, मनोरंजनपर कार्यक्रम, प्रबोधनपर व्याख्याने, मोफत दाढी-कटिंग, जुन्या कपडय़ांची शिलाई, चप्पल दुरुस्ती, औषधोपचार आणि मसाज या सेवा दिल्या जाणार आहेत.
मोफत तपासणी शिबिर
योगेश तिवारी मित्र परिवारातर्फे शनिवारी (११ जुलै) पालखीतील वारक ऱ्यांसाठी मोफत तपासणी आणि औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वारक ऱ्यांवर इलाज करून त्यांची पुढील यात्रा सुखकर करण्याचा हा उपक्रम गेल्या नऊ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. नारायण पेठ येथील निघोजकर मंगल कार्यालय येथे सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळात होणाऱ्या या शिबिरामध्ये डॉ. अधीर तांदळे, डॉ. सुभाष गुंदेचा, डॉ. अभिजित बोरा आणि डॉ. ज्योती शाळिग्राम वारक ऱ्यांची तपासणी करणार असून साईनाथ मेडिकल औषधे उपलब्ध करून देणार आहेत. अधिक माहितीसाठी िदडीप्रमुख आणि वारक ऱ्यांनी ९४२१३५०००० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोहळय़ाचा वृत्तांत आकाशवाणीवर
पालखी सोहळ्याचा वृतांत श्रोत्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणीची यंत्रणा सज्ज झाली आहे. आकाशवाणीच्या इतिहासात प्रथमच हे केले जात आहे. या काळात वीस दिवस दररोज आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी ९ वाजता अध्र्या तासाचा वारीचा वृतांत प्रसारित केला जाणार आहे. याशिवाय रोज संध्याकाळी ४.३० ते ६.३० या दोन वेळात थेट प्रसारण केले जाणार आहे. तसेच, जुन्या भाविकांच्या मुलाखती, वारीतील अनेक घडामोडीही श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत, असे आकाशवाणीकडून सांगण्यात आले.
व्होडाफोनची सलग तिसऱ्या वर्षी
वारवारकऱ्यांसाठी मोफत मोबाईल सेवा
पालखीदरम्यान ‘व्होडाफोन इंडिया’ कंपनीच्या चार मोबाइल बस वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होत आहेत. गेल्या दोन वर्षांप्रमाणेच यंदाही या बस वारकऱ्यांबरोबर पुणे ते पंढरपूर प्रवास करतील. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावर प्रत्येकी दोन बस असतील. त्यामुळे वारकरी आपल्या घरच्यांच्या, नातेवाईकांच्या संपर्कात राहू शकतील. मोबाइल बसमध्ये मोफत फोन करण्याची, मोबाइल फोन चार्ज करण्याची सुविधा, तसेच रिचार्ज व्हाउचर, आदी सुविधा उपलब्ध आहेत. या दोन्ही पालख्यांच्या विश्वसांच्या हस्ते या बसचे उद्घाटन करण्यात आले. व्होडाफोन इंडियाचे आशिष चंद्रा या वेळी उपस्थित होते.