पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. पोटनिवडणुकीसाठी बारामतीमध्ये ३ लाख ८८ हजार ३७१ मतदार असून, ३० ऑक्टोबर २०२४ च्या अंतिम मतदारयादीमध्ये ७ हजार ७६३ मतदारांची वाढ झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या ३ लाख ८० हजार ६०८ एवढी होती.

बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली. या प्रारूप मतदारयादीवर येत्या २५ फेब्रुवारी पर्यंत दावे आणि हरकती नोंदविता येणार आहेत. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रारूप मतदारयादीचे वितरण विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना करण्यात आले आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये ३० ऑक्टोबर २०२४ च्या अंतिम मतदारयादीमध्ये एकूण ३ लाख ८० हजार ६०८ मतदार होते. प्रारूप मतदारयादीत त्यामध्ये ७ हजार ७६३ एवढी वाढ झाली असून, मतदारसंख्या ३ लाख ८८ हजार ३७१ एवढी झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीमधील पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९२ हजार ८१९ होती. तर, महिला मतदारांची संख्या १ लाख ८७ हजार ७६५ एवढी होती. प्रारूप मतदारयादीमध्ये ही संख्या अनुक्रमे ३ हजार २८३ आणि ४ हजार ४४० एवढी वाढली आहे. मतदारसंघात २४ तृतीयपंथी मतदार आहेत.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ जानेवारी २०२६ च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत ही प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रारूप मतदारयादीवर येत्या २५ फेब्रुवारीपर्यंत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावे आणि हरकती सादर करता येणार आहेत. मतदारांनी त्यांचे नाव प्रारूप मतदारयादीमध्ये आहे की नाही, याची तपासणी करावी. नाव नसल्यास फाॅर्म क्रमांक सहभा भरून मतदारयादीत नाव नोंदवावे. तसेच नावामध्ये किंवा मतदार यादीतील तपशीलामध्ये दुरुस्ती असल्यास फाॅर्म क्रमांक आठ भरावा, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

प्राप्त दावे आणि हरकतीवर सहा मार्च रोजी निर्णय घेण्यात येणार असून, दहा मार्च रोजी अंतिम मतदारयादी जाहीर केली जाईल. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी